BULDANA LIVE SPECIAL खासदारकीच्या दाव्याला आ. संजय गायकवाडांकडून अर्धविराम;
आता खासदार प्रतापराव जाधवांच्या वाढदिवसानिमित्त गुरूंची मर्जी राखण्यासाठी आ. गायकवाडांचा "" आहे प्लॅन! पण..."बूँद से गयी वो हौद से आयेगी क्या?"
१९९९ ला अपक्ष लढा देत ५३६०, २००४ ला अपक्षच ३२३५१, २०१४ ला मनसेच्या तिकिटावर ३५३२४ अशी चढती मते घेत विधानसभेच्या रिंगणातील ३ पराभव पचवणाऱ्या संजय रामभाऊ गायकवाडांसाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खा. प्रतापराव जाधवांनी ताकद लावली. तीनदा आमदारकी "उपभोग"णाऱ्या विजयराज शिंदेंचा पत्ता कट करून संजय गायकवाडांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली अन् मग गायकवाडांनी देखील बुलडाणा विधानसभेच्या इतिहासातील ६७७८५ एवढी विक्रमी मते घेत विजयश्री खेचून आणली. आमदार झाल्यानंतर मात्र आ. गायकवाडांनी मागे वळून पाहिलेच नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी अन् आता महायुती सरकार मध्ये असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चांगलीच जवळीक साधली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला, जिल्ह्यात कुठल्याही विधानसभा मतदारसंघात नव्हे तेव्हढा निधी पहिल्यांदा आमदार असलेले आ.गायकवाड खेचून आणत आहेत. रोखठोक विधांनांनी ते सातत्याने राज्यात चर्चेचा विषय ठरलेत. शिवसेनेत झालेल्या उठावानंतर आ. गायकवाडांना मुख्यमंत्री शिंदेंनी थेट बुलडाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद बहाल केले. तोपर्यंत जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी खा.जाधव सांभाळत होते, यावरून त्या पदाचे महत्व लक्षात येईल..!
आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आ. गायकवाडांच्या महत्वकांक्षा जागृत झाल्या. तसा प्रचारदेखील त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना "भाजपच्या सर्वेत प्रतापराव जाधवांची जागा ३ नंबरला दाखवली, त्यामुळे शिवसेनेची जागा जाऊ द्यायची नाही, जागा शिवसेनाच लढवणार, ते पराभूत होत असतील तर आम्ही लढू" असे म्हणत आ. गायकवाड यांनी वेळ मारून नेली. तिकडे भाजपा आमदार संजय कुटे यांनी भाजपने असा कोणता सर्वेच केला नसल्याने सांगितले..त्यामुळे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदाच बॅकफुटवर गेल्याचे दिसले..तिकडे खा. प्रतापराव जाधवांना देखील आ. गायकवाडांची बाब खटकली असेलच मात्र त्यांनी तसे बोलून न दाखवता "जास्त इच्छुक म्हणजे पक्षात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण" अशी प्रतिक्रिया देत आपण मुरलेले राजकारणी असल्याचे दाखवून दिले..
आता मर्जी राखण्याचे प्रयत्न...
खा. प्रतापराव जाधव शिवसेनेत ज्येष्ठ नेते आहेत. स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी खा.जाधव आपले राजकीय गुरू असल्याचे अनेकदा सांगितले आहे. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या "लोकसभा" विषयामुळे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कुठेतरी संशयाला जागा निर्माण झालीच नसेल असे दाव्याने म्हणता येणार नाही. आमदार गायकवाडांनी आता या विषयाला अर्धविराम दिलाय, गेल्या आठ दिवसांत तसले कुठलेही पोस्टर्स किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यात आले नाही..अर्थात शिवसेना नेतृत्वाकडून घाई न करण्याच्या तशा सूचनाच आ. गायकवाडांना दिल्या गेल्या असतील.दरम्यान जे झालं गेलं त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता आमदार गायकवाड यांच्याकडून होतांना दिसतोय..तो खा.प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त..२४ नोव्हेंबरला आमदार संजय गायकवाड यांनी खा.प्रतापराव जाधव यांची लाडूतुला करण्याचं ठरवलंय.आ.गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार आहे..लोकसभा विषयावर जी काही कटुता निर्माण झाली असेल ती एकमेकांना गोड लाडू भरवून संपवण्याचा हा प्रयत्न असू शकतो..मात्र "बुंदसे गयी ओ हौदसे आयेगी क्या?" असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात नक्कीच विचारल्या जाईल...