BULDANA LIVE SPECIAL भाजपात दोन जिल्हाध्यक्ष बनवण्याच्या हालचाली; घाटावर अन् घाटाखाली असे होणार कार्यक्षेत्राचे विभाजन; लोकप्रतिनिधींना संघटनात्मक जबाबदारी न देण्याचाही निर्णय!
आमदार आकाश फुंडकरांचे पद जाणार; नवा जिल्हाध्यक्ष निवडतांना "ही" चूक महागात पडेल..!
May 11, 2023, 17:32 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली मातृसंस्था मानणाऱ्या भाजपने आता संघटन पातळीवर संघाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसतेय. बुलडाणा जिल्ह्याचे दोन भाग करून दोन जिल्हाध्यक्ष देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. घाटावर अन् घाटाखाली अश्या पद्धतीने जबाबदारी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय देखील भाजपच्या प्रदेश पातळीवर झालाय. त्यामुळे सध्याचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांचे पद जाणार असल्याचे निश्चित आहे
मोठ्या भौगोलिक क्षेत्राचे विभाजन करून संघटन बांधणी केल्यास, कार्यविभाजन केल्यास पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीला न्याय देता येतो, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आधीपासून तशी रचना केली आहे. संघाच्या कार्यपद्धतीत सध्या बुलडाणा आणि खामगाव असे दोन वेगवेगळे जिल्हे आहेत, शिवाय कामाच्या सोयीसाठी चिखली,बुलडाणा, खामगाव अशा मोठ्या तालुक्यांमध्ये काही नवीन तालुक्यांची रचना केली आहे. त्याच धर्तीवर आता भाजप देखील संघटनात्मक बांधणी करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत जिल्ह्यात भाजपला दोन जिल्हाध्यक्ष मिळालेले दिसतील.
नवा जिल्हाध्यक्ष निवडतांना...
आमदार आकाश फुंडकर यांच्याआधी बुलडाण्याचे माजी आमदार धृपदराव सावळे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेस आणि काही काळ राष्ट्रवादीत घालवलेल्या धृपदरावांना भाजपने आल्याआल्या संघटनेतील मोठे असे जिल्हाध्यक्ष पद दिले होते. भाजपची वैचारिक बैठक, कार्यपद्धती याबाबत अनभिज्ञ असलेल्या धृपदरावांना लगेच मोठे पद दिल्याने पक्षातील जुनेजाणते कार्यकर्ते नाराज झाले होते. केवळ पदापुरते मिरवणारे धृपदराव सावळे पद जाताच पक्षकार्यापासून स्वतःला अलिप्त ठेवत असल्याचे दिसून आले, अर्थात भाजपच्या वैचारिक जडणघडणीत घडलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला धृपदरावांचे असे स्वार्थी वागणे आवडले नसणार". कारण "पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना" हा विचार भाजपच्या प्रशिक्षण वर्गात अनेकदा शिकविल्या जातो. या पार्श्वभूमीवर नवा अध्यक्ष देताना भाजपला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. पद मिळविण्याच्या अपेक्षेने नव्याने पक्षात आलेल्यांना जिल्हाध्यक्षसारखी मोठी जबाबदारी देणे ही चूक भाजपला महागात पडू शकते. संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या, पक्षाची वैचारिक बैठक पक्की असलेल्या आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या जिल्हाध्यक्षाचा शोध आता भाजपला घ्यावा लागणार आहे.