BULDANA LIVE SPECIAL आमदार डॉ. संजय कुटेंना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून का हटवले?

नवी जबाबदारी की दुसरच काहीतरी! भाजपात विनाकारण पदावरून हटवत नाहीत अन् विनाकारण पदावर बसवतही नाहीत! वाचा आमदार डॉ.कुटेंचा मेळ कसा हुकला..

 
kute
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातल्या  सत्तापरिवर्तनानंतर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडील सूत्रे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्याकडे सोपवली जातील, डॉ.संजय कुटे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशा बातम्या धडकू लागल्या होत्या. शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद नाही मिळाले म्हणून काय झाले आमचा नेता आता जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होतोय.. असे म्हणत जळगाव जामोद मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील कुटे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते...पण झालं उलटच.. नागपूरच्या बावणकुळेंच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली, अन आमदार कुटेंवर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहण्याची वेळ आली..शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होऊन १० महिने उलटून गेलेत मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही..सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सरकारची मुदत संपेपर्यंत तो होईल असे दिसत नाही..त्यातच आता आमदार डॉ.संजय कुटेंना आता प्रदेश कार्यकारणीतून सुद्धा काढून टाकण्यात आले आहे, आधीच्या कार्यकारिणीत ते प्रदेश उपाध्यक्ष होते..!
 

२००४ पासून तर आजपावेतो आमदार डॉ. संजय कुटेंनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांत पडलेली फूट देखील वारंवार आमदार डॉ.कुटेंच्या विजयाचे कारण ठरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेवटच्या काही महिन्यांत डॉ.कुटेंना मंत्रीपद मिळाले , बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविण्याची संधी देखील त्यांनी मिळाली. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचेही सर्वच स्तरातून कौतुक झाले.आधी पक्ष संघटनेत  प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या डॉ.कुटेंना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून बढती मिळाली. महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना सुरत आणि गुवाहाटीची जबाबदारी देखील फडणवीसांनी विश्वासू डॉ. कुटेंवर सोपवली. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी ओळख मिळवल्याने त्यांचा मंत्रिमंडळात मेळ जमेल असे अनेकांना वाटले मात्र तो काही जमला नाही.तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता प्रदेशाध्यक्ष पद डॉ. कुटेंना मिळेल अशाही चर्चा होऊ लागल्या मात्र तिथे बावणकुळेंनी जमवल्याने तिथेही डॉ. कुटेंचा मेळ हुकला. 
    
 प्रदेश उपाध्यक्ष पदावरून डच्चू..आता पुढे काय?

दोन दिवसांपूर्वी भाजपची नवीन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली. प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉ.संजय कुटेंना या कार्यकारणीतून डच्चू देण्यात आला. मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेतींना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले. आधी मंत्रीपद, नंतर प्रदेशाध्यक्षपदाची संधी आणि आता प्रदेश कार्यकारिणीतून हुकल्याने डॉ. कुटेंभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपसारख्या पक्षात विनाकारण कुठल्या व्यक्तीला कुठल्या पदावरून काढत नाहीत अन् विनाकारण पदावर बसवत नाहीत असा शिरस्ता आहे. त्यामुळे कुटेंना डावलण्याचे कारण काय असावे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदार कुटेंना दुसरी जबाबदारी देण्यासाठी सध्याच्या जबाबदारीतून मुक्त केले असावे असाही एक अर्थ याप्रकरणातून  काढता येऊ शकतो..अर्थात नवी जबाबदारी मिळेपर्यंत जो तो आपापल्या परीने याचे वेगवेगळे अर्थ काढण्यास मोकळा आहे..!