BULDANA LIVE SPECIAL जिल्ह्याच्या राजकारणावर बोलू काही! खासदार प्रतापराव जाधवांचे कट्टर विरोधक असलेल्या विजयराज शिंदेंना भाजपचा बूस्टर डोस!

शिंदेचा हुकलेला मेळ जमेल का? मेळ हुकवणाऱ्यांशी शिंदे खरच जुळवून घेतील का..?
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातही नियोजन करण्यात भाजपा इतर पक्षांच्या तुलनेत चार पावले पुढेच आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघापुरते बोलायचे झाल्यास गेली दीड वर्षे आधीपासूनच भाजपने मतदारसंघात चांगलाच जोर लावला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तर भाजपने खासदार प्रतापरावांचा गड उध्वस्त करण्याच्या दिशेने तयारी सुरू केली होती. मात्र राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर त्याला काहीसा ब्रेक लागला..कारण खासदार प्रतापराव एकनाथ शिंदेसोबत असल्याने आता उघड उघड काही करता येणार नव्हत. मात्र असे असले तरी भाजपने कधी लोकसभा प्रवास योजना, कधी मोदी @9 अशी नावे देऊन वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्यात राबवले, त्याचा हेतू पक्षसंघटन सांगितला जात असला तरी अंतिमत: बुलडाणा लोकसभेवर भाजपचा खासदार याच उद्देशाने हे सगळे कार्यक्रम राबवले जात आहेत हे लपून राहिलेले नाही. खासदार प्रतापराव जाधवांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जात असलेल्या विजयराज शिंदेंना भाजपने नुकतीच बुलडाणा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. एकमेकांना कायम पाण्यात पाहणारे दे दोन नेते खरचं एकमेकांसाठी, त्यातही  विजयराज प्रतापरावांसाठी काम करतील का असा प्रश्न आता चर्चेत आहे.
 

 विधानसभा निवडणुकीत  शिवसेनेकडून आपले तिकीट कापण्यात खासदार प्रतापराव जाधवांचाच हात आहे याची खात्री विजयराज शिंदेंना आहे. खासदार जाधवांनीच पुढाकार घेत तिकीटाची माळ संजय गायकवाडांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे "त्या" दोघांमुळेच आपला मेळ हुकला याचा राग विजयराज शिंदेच्या डोक्यात आहे. हुकलेला मेळ जमवण्यासाठी विधानसभा निवडणुकीपुरते ते वंचित मध्ये गेले मात्र तिथेही ते वंचित राहिले. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मात्र "त्या" दोघांना विरोध करता येईल म्हणून भाजपची वाट धरली. दीड - दोन वर्षे त्यांनी चांगलीच गाजवली देखील. विरोधी पक्षात असताना आंदोलने, आक्रमक पवित्रा घेण्यात ते आघाडीवर दिसले. आमदार संजय गायकवाडांशी देखील पंगा घ्यायला त्यांनी मागेपुढे बघितले नाही. भाजपकडून आगामी लोकसभा उमेदवार म्हणून देखील त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली पण पुन्हा खेळ बिघडला. राज्यात शिंदे - फडणवीस एकत्र आल्यावर ज्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यासाठी भाजपची वाट धरली होती नाईलाजाने का होईना त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ विजयराज शिंदेंवर ओढवली. एवढेच नव्हे तर राजकीय भविष्यही अंधातरी दिसू लागले. कारण  एकनाथ शिंदे आणि भाजपची युती कायम राहिली तर लोकसभेला प्रतापराव जाधव आणि बुलडाणा विधानसभेत आमदार संजय गायकवाड हेच उमेदवार राहण्याची शक्यता अधिक आहे . अशा परिस्थितीत पुन्हा विजयराज शिंदेचा मेळ हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही..! 

  अन् भाजपने पुन्हा बूस्टर डोस दिला..!
    
राज्यात शिंदे - फडणवीस एकत्र आले असले तरी जिल्ह्यातले शिंदे मात्र त्यांचा मेळ हुकवणाऱ्या"त्या"दोघांशी जुळवून घेण्याची शक्यता नाही. दुसरीकडे भाजपने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अनेक कार्यक्रम राबवले. केंद्रीय नेत्यांचे दौरे झाले. बुलडाणा लोकसभेचा पुढचा खासदार भाजपचाच असे थेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलून गेले. त्यादृष्टीने भाजपने तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढेल अशी आशा विजयराज शिंदेंना आहे. राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारमध्ये ऐनवेळी काही मतभेद होतील आणि भाजपा स्वबळावर लढेल असे झाल्यास एकतर विधानसभा किंवा लोकसभा कुठेतरी मेळ जमेल असे शिंदेंना वाटू शकते..तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातो म्हटले तरी जालिंधर बुधवंत आणि नरेंद्र खेडेकरांना ते रुचणार नाही. त्यामुळे सध्यातरी भाजपच्या सावलीत राहण्याशिवाय दुसरा पर्याय विजयराज शिंदेंकडे नाही. त्यातच भाजपने आता विजयराज शिंदेंना लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून "बूस्टर डोस" दिल्याने गेल्या वर्षभराची निराशा थोडीफार का होईना दूर होणार आहे. आता लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून विजयराज शिंदे कशा पद्धतीने काम करतात याकडे राजकीय विश्लेषकांसह खुद्द खासदार प्रतापराव जाधव देखील लक्ष ठेवून राहतील कारण खासदार प्रतापराव जाधवांनीच विजयराज शिंदेचा मेळ हुकवलाय हे शिंदे विसरणार नाहीत.