BULDANA LIVE EXCLUSIVE अति -आत्मविश्वासाने झाला रणजित पाटलांचा घात! पक्षातली नाराजीही कारणीभूत!

माजी गृह राज्यमंत्र्याला पराभूत करण सोप नव्हतच..पण..! स्वतःच्या हातांनी केला स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा...
 
Patil
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अती तिथे माती अशी मराठीत म्हण आहे..ही म्हण आज माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासाठी तंतोतंत लागू  ठरली. आपला पराभव होणारच नाही, गुलाल आपलाच याच अर्विभावात रणजित पाटील गेल्या महिनाभरापासून वावरतांना दिसले, आणि शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आज ३ फेब्रुवारीला लागलेल्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत रणजित पाटील पराभूत झाले. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांचा विजय झाला. दस्तरखुद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमरावतीचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं म्हटलय.

 तब्बल १२ वर्षांपासून रणजित पाटील पदवीधर मतदार संघाचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गृह आणि नगरविकास सारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद त्यांनी भूषवले. देवेंद्र फडणवीसंच्या खास कोट्यातील असल्याने कदाचित आता जर ते निवडणूक जिंकले असते तर त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र आता रणजित पाटलांचे हे स्वप्न सध्यातरी धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. अर्थात स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा रणजित पाटलांनी स्वतःच्या हाताने केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार धिरज लिंगाडे यांना सहज घेण्याची चूक रणजित पाटलांना चांगलीच महागात पडली.

    
पक्षांतर्गत नाराजी..!
 
१२ वर्षे आमदार आणि मंत्रीपद सांभाळताना रणजित पाटील यांच्या   महत्वकांक्षा जास्तच वाढत गेल्या. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी अकोला जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात रणजित पाटलांनी जास्त इंटरेस्ट घेतला. रणजित पाटील यांच्यामुळे असुरक्षिततेची भावना तयार झाल्याने अकोला जिल्ह्यातील जुना जाणता भाजपचा गट बाजूला गेला. तुटले तर तुटुद्या...जोडायचे कशाला असे वागत रणजित पाटलांनी  स्वतःचा वेगळा गट निर्माण केला. जिल्ह्यातले आमदार खासदार एका बाजूला अन् बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी घेऊन रणजित पाटील दुसऱ्या बाजूला अशी स्थिती अकोला जिल्ह्यात तयार झाली. त्याचाच परिणाम या निवडणुकीत दिसला. अकोला भाजपचे नेते रणजित पाटलांच्या प्रचारासाठी फिरतांना यावेळी दिसले नाहीत.
   
 नियोजनाचा अभाव..!

मुळात नियोजनाचा अभाव म्हटल्यापेक्षा नियोजनाची गरजच रणजित पाटील व त्यांच्या टीमला वाटली नाही. इतर जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांना त्यांनी विश्वासात घेतले नाही. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर उघडपणे भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.
    
धिरज लिंगाडेंची दमदार एन्ट्री..!

आधी तिकीट मिळेल की नाही यावरूनच संभ्रम.. त्यातही काँग्रेसकडून तिकीट मागणाऱ्यांना डावलून शिवसेनेच्या नेत्याला काँग्रेसने ऐनवेळी तिकीट दिले. त्यामुळे सुरुवातील काँग्रेसचा एक गट नाराज होताच. मात्र त्याही परिस्थीत प्रचारासाठी कमी कालावधी शिल्लक असताना लिंगाडे व त्यांच्या टीमने व्यवस्थापन कशाला म्हणतात हे दाखवून दिले. पाचही जिल्ह्यात प्रचाराचे उत्तम नियोजन केले. अनेक संघटनांचा पाठींबा मिळवला. स्वतः धिरज लिंगाडे प्रचारासाठी झटणाऱ्या टिमशी समन्वय साधून होते. प्रत्येक जिल्ह्यात लिंगाडे यांना पदवीधरांचा मोठा पाठिंबा मिळाला. प्रत्येक बुथचे नियोजन लिंगाडे यांनी केले आणि या प्रयत्नाला यश मिळालेच. रणजित पाटलांचे नेटवर्क पाहता  माजीगृहराज्य मंत्र्याला पराभूत करणे सोपे नव्हतेच मात्र माजी गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने रणजित पाटलांना पराभूत करून दाखवलेच..!