BULDANA LIVE EXCLUSIVE राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात? राष्ट्रवादीने घेतला बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा !मुंबईत तयारी अन मागील लढतीचा आढावा
Mar 7, 2024, 14:59 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जागा वाटप आणि उमेदवारीचा गुंता कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने बुलडाणा मतदारसंघाचा तपशीलवार आढावा घेतला. यामुळे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात उतरतात काय? यावर खमंग चर्चा सुरू झाली आहे.
सध्या लोकसभा निवडणूक पूर्व हालचालींचे केंद्रबिंदू ठरलेल्या राजधानी मुंबईत बुधवारी (दि ६) ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेते हजर होते . बैठकीत बुलडाण्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण शाखा, मागील काळात सहा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडून आलेल्या जागा, मतदान केंद्र प्रमुख, पक्षाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादीला आजवरच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान, पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली. बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह बुलडाणा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
खमंग चर्चा आणि लढती
तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या मुहूर्ताची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मतदारसंघाच्या जागेचा तिढा कायम आहे. २००९ पासून सलग विजय मिळविणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीची 'गॅरंटी' नसल्याचे चित्र आहे. भाजपने बुलडाण्यावर अप्रत्यक्षपणे पण जोरदार दावा केला आहे. मित्रपक्षातील या ताणाताणीत अजितदादा गटाने बुलडाण्यावर बैठक घेतल्याने महायुतीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान अजित पवार गटाने लावलेल्या आढावा बैठकीमुळे मित्र पक्षासह विरोधकांचे कान टवकारले आहे. भाजपा व शिंदे गटातील तिढा सुटला नाही तर ऐनवेळी अजित पवार गटाला तर जागा सुटणार नाही ना? व शिंगणे यांना मैदानात उतरविले जाते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार शिंगणे यांनी यापूर्वी २००९ व २०१९ मध्ये बुलडाण्यात अपयशी झुंज दिली होती. सन २०१४ मध्ये ज्येष्ठ नेते कृष्णराव इंगळे यांनी लढत दिली होती. १९९९ च्या पहिल्याच लढतीत पक्षाचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी लाखांवर मते घेतली होती.