BULDANA LIVE EXCLUSIVE मोदींच्या टीममध्ये ना.प्रतापराव जाधवांवर "स्पेशल" जबाबदारी! थेट पंतप्रधान मोदींना करणार रिपोर्टिंग!
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि राज्यमंत्र्यांमध्ये काय असतो फरक? जाणून घ्या...
Jun 10, 2024, 10:34 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान म्हणून काल,९ जूनच्या सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासह ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बुलडाणा जिल्ह्यासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या प्रतापराव गणपतराव जाधव यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ना.जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे "स्वंत्रत प्रभार" देण्यात येणार आहे. त्यामुळे खा. जाधव यांना त्यांच्या खात्याच्या निर्णयासंदर्भात, ध्येय- धोरणासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिपोर्टिंग करावे लागणार आहे. खा.जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
Advt.👆
९ जूनच्या सकाळीच खा. प्रतापराव जाधव यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. सकाळी साडेअकरा वाजता नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांना चहापानाला निमंत्रित करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी खा.जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे एकूण ७ खासदार निवडून आले असून त्यापैकी सर्वात सिनिअर सदस्य या नात्याने खा.जाधव यांचे नाव मंत्री म्हणून निश्चित करण्यात आले. शिवसेनेला कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र खा.जाधव आता एका खात्याचे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून काम सांभाळणार आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्यांपेक्षा अधिकचे अधिकार मिळणार आहेत.
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यामध्ये काय असतो फरक..
पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा नंबर लागतो. अति महत्वाच्या आणि मोठ्या विभागांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री दिले असतात. त्या त्या विभागाच्या निर्णयांना त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री जबाबदार असतात. कॅबिनेट मंत्र्यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर रहावे लागते. दुसरीकडे जे राज्यमंत्री असतात ते कॅबिनेट मंत्र्यांना मदत करतात. कॅबिनेट मंत्र्यांच्या सुचनेनुसार राज्यमंत्री काम करतात. एखाद्या खात्याला दोन कॅबिनेट मंत्री असू शकत नाही, मात्र एक कॅबिनेट मंत्री आणि त्यांना सहाय्यक म्हणून दोनपेक्षा अधिक राज्यमंत्री असू शकतात. राज्यमंत्र्यांकडे त्या खात्यातील काही विभागांची जबाबदारी त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री देतात. मात्र त्या खात्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यमंत्र्यांना नसतात. स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री मात्र त्यांच्या खात्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. कोणत्या खात्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री द्यायचे याचा निर्णय पंतप्रधान घेतात. ज्या खात्यांना कॅबिनेट मंत्री नसतात अशा खात्याची जबाबदारी स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्याकडे असते. त्यामुळे स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्टिंग करावे लागत नाही ते थेट पंतप्रधानांना रिपोर्टिंग करतात. राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होता येत नाही मात्र स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री त्यांच्या खात्याच्या चर्चेवेळी बैठकीत सहभागी होऊ शकतात. आता ना.प्रतापराव जाधव यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवतात याकडे संपूर्ण बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.