BULDANA LIVE EXCLUSIVE २१ उमेदवारांमुळे निवडणूक विभागाची वाढली डोकेदुखी! जोडावे लागणार अतिरिक्त बॅलेट युनिट!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात तब्बल २१ उमेदवार शिल्लक राहिल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे राजकीय पक्ष, मतदारच नव्हे तर निवडणूक विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक यंत्रणांसाठी उमेदवारांची महा संख्या ही साधी नव्हे तर महा- डोकेदुखी ठरली आहे. याचे कारण देखील महा आहे. याचे मूळ अधूनमधून आणि निवडणूक काळात जास्तच वादग्रस्त ठरणाऱ्या 'इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन' मध्ये दडलंय! ईव्हीएम ला बॅलेट युनिट व कॅट्रोल युनिट जोडलेले असतात. बॅलेट युनिटवर मतदार मतदान करतात. या मतदान संचाची क्षमता 'नोटा'सह १६ इतकी असते. वरील १५ ठिकाणी उमेदवारांचा तपशील आणि सर्वात शेवटी 'नोटा' ( वरील पैकी कोणीही नाही)चे बटन राहते. रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ते बटन दाबून नकारार्थी मतदान करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र बॅलेट युनिट ची क्षमता नोटासह १६ इतकीच आहे. बुलढाण्यातील संग्रामात त्यापेक्षा जास्त म्हणजे २१ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ईव्हीएम ला आणखी एक बॅलेट युनिट जोडावे लागणार आहे. त्यामुळे यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.
 दरम्यान जिल्ह्याला पुरेश्या प्रमाणात मशीन , दोन्ही युनिट्स, व्हीव्हीपॅट मिळाले आहे. आयोग १५ पेक्षा जास्त उमेदवारांची शक्यता गृहीत धरून युनिट्स पाठवितो. यामुळे बॅलेट युनिट्स आणण्यासाठी धावपळ करण्याची डोकेदुखी टळली आहे. मात्र मागील सरमिसळ मध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान साहित्य पाठविण्यात आले आहे. आता सर्वठिकाणी सरमिसळ करून जादाच्या बॅलेट युनिट्स पाठवाव्या लागतील. हे अतिरिक्त युनिट विधानसभा स्तरावर मशीनला जोडून घ्यावे लागणार आहे. ही कार्यवाही याच आठवड्यात करावी लागणार आहे.