मुंबईत बुलडाणा जिल्हा काँग्रेसची बैठक चांगलीच रंगली! जिल्ह्यात काँगसचीच ताकद, त्यामुळे लोकसभेवर काँग्रेसचाच हक्क; जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांची वरिष्ठांकडे एकमुखी मागणी ;

 म्हणाले, तेव्हाच जागा सोडून चूक केली..

 
congress
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू आहे. सध्या आघाडी किंवा युती असली तरी ऐनवेळी काही भानगड झाली तर तारांबळ उडू नये म्हणून प्रत्येकच पक्ष सावध आहे. भाजपने वर्षभराआधीपासून  लोकसभेची तयारी सुरू केली आहे. आता प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील चाचपणी सुरू केली आहे. काल,२ जून रोजी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील कोअर टीमला त्यासाठी मुंबईत बोलावण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक घेण्यात आली, बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांची फौज त्यासाठी काल मुंबईत पोहचली होती. महाविकास आघाडीत बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचीच ताकद जास्त आहे. याआधी काँगसने बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दमदार विजय मिळवले आहेत. मागील तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला इथे काही जमले नाही. २००९ ला हक्काची जागा सोडून आपली चूक झाली. त्यामुळे आपला हक्काचा मतदारसंघ परत घ्या, आपल्याकडेच निवडून येणारा उमेदवार आहे अशी एकमुखी मागणी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.
 

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे,  विधानपरिषद सदस्य धिरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, जयश्री शेळके,स्वाती वाकेकर, अनंता वानखेडे, दिलीप जाधव, लक्ष्मणराव घुमरे, सुनील सपकाळ, सतीश महेंद्र या बैठकीला उपस्थित होते. 
     
जिल्ह्यात काँग्रेसच मजबूत..!

सध्या काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांपेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे. मागील २५ वर्षांचा काळ सोडला तर बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर अधिक काळ काँग्रेसचाच खासदार राहिला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या २५० किलोमिटरच्या परिघात काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मागील तिन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या मात्र राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नाही, त्यामुळे आपण आपल्या हक्काचा मतदारसंघ आपल्याकडे घ्या अशी मुद्दे जिल्हा काँगसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. काँग्रेसकडे विजय मिळवून देणारे उमेदवार आहेत याकडे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.