BREAKING विजयराज शिंदेंना धक्का! शिंदेंच्या माणसाला शहराध्यक्षपदावरून काढले, पक्षातूनही हकालपट्टी ; भाजपच्या निष्ठावान पदाधिकाऱ्याला केली होती शिवीगाळ...

 
Shinde
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंनी शिफारस करून शहराध्यक्ष पदावर बसवलेल्या अनंता शिंदे यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी ही कारवाई केली आहे.
   ३० नोव्हेंबरला भाजपच्या बुलडाणा शहराध्यक्षपदी अनंता शिंदे यांची नियुक्ती केली होती. त्याचवेळी निष्ठावान पदाधिकारी नाराज झाले होते. जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यावेळीच झाला होता. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जवळचा कार्यकर्ता या एकमेव निकषाच्या आधारावर अनंता शिंदे यांची नियुक्ती केल्याचा आरोप ही भाजपचे पदाधिकारी करीत होते. शहराध्यक्ष झाल्यानंतर अनंता शिंदे यांना शहर कार्यकारिणीची घोषणा देखील करता आली नव्हती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनंता शिंदे यांनी काल, ६ मार्चला भाजपच्या निष्ठावान महिला पदाधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केली, असभ्य व शिवराळ भाषेत संभाषण केले. दरम्यान यानंतर लगेच वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. काल रात्री उशिरा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी अनंता शिंदेंना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकत पक्षातून हकालपट्टी केली.