Amazon Ad

BREAKING खळबळजनक! खासदार प्रतापराव जाधवांचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न? व्हिडिओ व्हायरल!

महिला सकाळपासून गायब; पोलिसांची टीम घेत आहे शोध! खासदार जाधव म्हणाले, आपला संबंध नाही, हा बदनाम करण्याचा प्रयत्न..
 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांचे नाव घेऊन एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज सकाळपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान महिलेने व्हिडिओ कुठून काढला, सध्या महिला कुठे आहे? याबद्दल नेमकी माहिती समोर आलेली नाही. जानेफळ पोलिसांची टीम महिलेचा दुपारपासून शोध घेत आहे, मात्र अद्याप महिला सापडलेली नाही. सदर महिला मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील राहणारी आहे. दरम्यान महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळून लावले आहेत.
सदर व्हायरल व्हिडीओत महिला तिचे नाव सरस्वती बद्दू राठोड असल्याचे सांगते. "माझ्यावर खूप अन्याय झाला, मला मदत मिळाली नाही..आज जे घडणार आहे ते सर्वकाही खासदार प्रतापराव जाधव आणि अजितनाथ मोरे यांच्यामुळे एवढी घटना घडू लागली" असे महिला सांगते. आपण आत्मदहनाचे प्रकरण दिले होते, मला कोणतीही मदत केली नाही. बाहेरगावच्या लोकांनी येऊन माझे घर तोडून नेले..मला एकच भाऊ आणि एकच आई आहे, त्यामुळे मला कोणाचा सहारा नाही, त्यामुळे मी नेहमी नेहमी वारंवार पोलिसांचा सहारा घेते. माझ्यावर आरोप घेतले खासदार साहेबांनी ,की मी खोटे रिपोर्ट देते. वारंवार काहीही करत राहती पैशासाठी... माझा अपमान करून त्यांनी मला परत पाठवलं" असे महिला व्हिडीओत म्हणत आहे. शिवाय अजितनाथ मोरे यांनी दबावापोटी कोणतीही कारवाई केली नसल्याचे महिला म्हणत आहे..महिला एका झाडाखाली बसलेली असल्याचे दिसत असून झाडाला दोर टांगलेला असल्याचे दिसत आहे.
खासदार प्रतापराव जाधवांनी आरोप फेटाळले..!
दरम्यान सदर महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळले आहेत. या महिलेचे जुने प्रकरण पोलीस ठाण्यात प्रलंबित आहे. या महिलेने परिसरातील अनेकांच्या तक्रारी दिलेल्या आहेत. मी या महिलेला ओळखत नव्हतो, काही दिवसांपूर्वी तिच्या तक्रारी घेऊन ती स्वतः माझ्याकडे आली होती. तेव्हा "तुझे स्थानिक गावकऱ्यांशी वाद आहेत, तू पोलिसांत जा" असे तिला म्हटले होते. यावेळी माझ्या घरी अनेक कार्यकर्ते हजर होते असे खा.जाधव बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले. निवडणुकीचा काळ असल्याने कुणीतरी आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने महिलेला हाताशी धरून हा उद्योग केला असावा असेही खा.जाधव म्हणाले..