BREAKING पक्की खबर..!आता विजयराज शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत...

 
चकमक
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दररोज भूकंपावर भूकंपाचे धक्के होत आहेत. आज दुपारी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देणारी पोस्ट करून महाविकास आघाडीत तणाव निर्माण केला असतांना आता महायुतीत देखील धुसफूस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप नेते विजयराज शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याची पक्की खबर आहे. त्यादृष्टीने कागदपत्रांची जुळवाजवळ देखील शिंदे यांनी सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
 अडीच वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश करून विजयराज शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र मध्येच शिवसेनेत फूट पडल्याने शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपासोबत आली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव असल्याने शिंदे यांच्या तयारीला ब्रेक लागला होता. त्याउपरही जिथे जिथे संधी मिळेल तेव्हा तेव्हा विजयराज शिंदे बुलडाणा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी आग्रही भूमिका मांडत होते. मात्र युतीच्या राजकारणात हा मतदारसंघ शिंदेगटाला सुटला. तेव्हापासून विजयराज शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. महायुतीच्या मेळाव्यात देखील विजयराज शिंदे अनुपस्थित होते, शिवाय मेळाव्याच्या बॅनर वर विजयराज शिंदे याचा फोटो देखील नव्हता त्यामुळे विजयराज शिंदे यांच्या समर्थक नाराज होते. आता विजयराज शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तूर्तास यावर बोलण्यास नकार दिला, मात्र "पाहू " असे सांकेतिक उत्तर दिले...