BREAKING प्रेरणादायी! जिल्हा बँकेच्या १२५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा अवयव दान संकल्प! ना. जाधवांच्या सत्कार सोहळ्यात घोषणा..
Jul 19, 2024, 13:40 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नुकतीच पुनर्जीवित झालेल्या जिल्हा बँकेने आज १९ जुलै रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा सत्कार मेळावा आणि सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. ना. जाधवांनी आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवयव दानाचा संकल्प केला होता. याच संकल्पनेतून प्रेरणा घेत, जिल्हा बँकेच्या १२५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ना. जाधवांच्या सत्कार सोहळ्याला सुरुवात होताच, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही घोषणा केली. एवढेच नाही तर, अवयव दान करण्यासाठीचा अर्ज कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांना सुपूर्द केले.
गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेला नुकतेच ३०० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर झाले. सहकार नेते तथा आमदार डॉ. शिंगणे यांच्या पुढाकारातून हे शक्य झाले. राज्य सरकारच्या हमीने हे लोन मंजूर झाल्याने, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा आर्थिक प्रश्न मार्गी लागला आहे. ना. जाधव आणि आ. शिंगणे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा बँकेला नवसंजीवनी मिळाली अशी भावना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी व्यक्त केली. यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रमुख अतिथी ना. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार तोताराम कायंदे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनुजाताई सावळे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ओमसिंग राजपूत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.