पिंपळगाव राजात क्रांतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! वन बुलडाणा मिशनचे आयोजन; संदीप शेळके म्हणाले,

रक्तदान लोकचळवळ व्हावी; क्रांतिकारकांनी रक्त सांडल्याने स्वराज्य मिळाले; आता स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी युवापिढीची धडपड गरजेची असल्याचेही प्रतिपादन..!
 
Ss
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाला गती देण्याची गरज आहे. ही ध्येयपूर्ती करण्यासाठी वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून लोकचळवळ सुरु केली आहे. युवकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.  
तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील स्व. हसनराव देशमुख सभागृहात क्रांतिदिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिर, युवक मेळावा आणि महिला बचतगटांना कर्जवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानातून देशाला स्वराज्य मिळाले. आता स्वराज्याचे सुराज्यात निर्माण करण्यासाठी युवापिढीने धडपड केली पाहिजे. देशात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे रक्तदानाची नितांत गरज आहे, रक्तदान ही लोकचळवळ झाली पाहिजे असेही संदीप शेळके म्हणाले.
 यावेळी सरपंच शेख शाकिर शेख चांद, सुनील राजपूत, अल्पसंख्याक मुस्लिम न्याय हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष जुलरूर शेख शेख चांद, विठ्ठल देशमुख, नारायण गावंडे, आवेद खान, वसंत तेलंग, प्रा. निसार अख्तर, डॉ. आर. के. राजपूत, अमोल राजपूत, चरण राजपूत, कोमल राजपूत, विशाल राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला बचतगटांच्या ३० महिलांना १२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. संदीप शेळके यांच्या हस्ते महिलांना धनादेश वितरण करण्यात आले. संचलन पृथ्वीराज राजपूत यांनी तर आभार सुनील राजपूत यांनी मानले.