धाडमध्ये "महावितरण'वर भाजपाचा धडक मोर्चा

आ. सौ. श्वेताताई महालेंचा इशारा... वीज तोडू नका अन्यथा जनताच शाॅक देईल!
 
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या ऐन रब्बी हंगामात वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक सुरळीत वीजपुरवठा करत नाही. कमी दाबाने, अनियंत्रित वीज पुरवठा केल्याने ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होतात. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यावर त्याचे वेळेवर रिपोर्टिंग केले जात नाही. रिपोर्टिंग न झाल्याने ट्रान्सफार्मर वेळेच्या आत देणे बंधनकारक असतानाही दुरुस्त करून मिळत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे कृषी पंप नादुरुस्त होतात. सक्तीच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याची धडक कारवाई सरकारकडून ऐन रब्बीच्या हंगामात केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या वसुलीसाठी सरकारने टार्गेट दिलेले आहे. हे सरकार शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थिती असतानाही सक्तीची पठाणी वसुली करीत आहे. त्यामुळे सरकारने वसुली बंद करून वीज कनेक्शन कट करणे थांबवावे अन्यथा जनता व शेतकरी हजारो व्होल्टचा शॉक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी धाडमध्ये धडक मोर्चाला संबोधित करताना दिला.
काल, १ नोव्‍हेंबरला आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या धाड येथील उपविभागीय कार्यालयावर भारतीय जनता पार्टीतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वीज कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवा. तोडलेले वीज कनेक्शन जोडून द्यावे. शेतकऱ्यांना १० तास वीज पुरवठा करावा. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्ती करून घ्यावे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास लाईनमन तातडीने रिपोर्टिंग करत नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून एसएमएसव्दारे रिपोर्टिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावे. ग्रामीण भागातील दिवस व रात्रीची सिंगल फेज लाईन चालू ठेवावी. भरलेले वीज बिल पुढील बिलातून वजा करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर पंचायत समिती सदस्य संदीप उगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीरंग एंडोले, सखाराम नरोटे, भागाजी पाटील, तेजराव पाटील, साहेबराव गवते, प्रकाश पडोळ, पंडीत देशमुख, अॅड. सुनील देशमुख, संतोष काळे, योगेश राजपूत, किरण सरोदे, गणेश बाजी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.