भाजपाच्या चित्रा वाघ म्हणाल्या 'चंद्रकांत पाटील यांसारखे ज्योतिबा पुढे यावे'! नव्या वादाची ठिणगी! काय म्हणाल्या प्रतिउत्तरात राष्ट्रवादीच्या अनुजा सावळे? वाचा..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवसागणिक काही राजकीय नेते वाटेल ते बरळताहेत.फॅशनच्या नावाखाली राज्यात नंगटपणा चालू देणार नाही, अशी भूमिका घेऊन उर्फी जावेदला विरोध केल्यामुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या प्रा. अनुजा सावळे पाटील आक्रमक झाल्या असून त्यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदविला.

क्रांतीज्योती महात्मा फुलेंची तुलना कोणाशी करता? त्यांचे कार्यकर्तृत्व अफाट आहे. त्यांची अशी तुलना करणे योग्य नाही.

भाजपाच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. तुमच्या प्रतिनिधींकडून महिलांच्या आणि महापुरुषांचे वारंवार अपमान होतात. प्रथम आपल्या प्रतिनिधींना,महिलांना महापुरुषांना सन्मान देण्याचे व महापुरुषांच्या आदर्शावर चालण्याचे धडे द्यावे. महापुरुषांवरील आणि संतांवरील अपमान यापुढे महाराष्ट्र खपवून घेणार नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रा. अनुजा सावळे म्हणाल्या.

चित्रा वाघ काय म्हणाल्या..


“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.