विधान परिषद निवडणुकीत भाजपचे व्यापारी कार्ड!

सराफा व्यापारी वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर!!
 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने व्यापारी कार्ड खेळले असून, सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर केली असून, राज्‍यातील उमेदवारांची अधिकृत घोषणा आज, १९ नोव्‍हेंबरला रात्री उशिरा भाजपकडून करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्‍यापुढे खंडेलवाल यांचे आव्हान उभे करण्यात आले आहे. खंडेलवाल हे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्‍यांचा सोने-चांदी आभूषण विक्रीचा व्यवसाय असून, शिक्षणक्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे. विशेष म्‍हणजे बुलडाणा लाइव्हने सर्वात आधी खंडेलवाल यांना उमेदवारी मिळणार असल्याचे भाकित वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले.

उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. यावेळी बाजोरियांना आव्हान देऊ शकेल असा एकमेव चेहरा खंडेलवाल यांचा समोर आला. त्‍यांचे नाव निश्चित झाले. मात्र अधिकृत घोषणा बाकी होती. यापूर्वी २००५ मध्येही खंडेलवाल यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. निवडणुकीचा त्‍यांना चांगला अनुभव आहे. अकोल्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्‍थेचे ते संचालकही आहेत. शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या तिन्ही वेळा सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले आहेत. मात्र तिन्ही वेळा भाजपा आणि शिवसेना सोबत होती. यावेळी भाजपा विरोधात असल्याने आणि भाजपाने खंडेलवाल यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने त्‍यांना ही निवडणूक जरा जडच जाईल, अशी चिन्हे आहेत.

खंडेलवाल यांचे वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जवळचे ते मित्र असल्याचे समजते. ते संघ परिवारातील आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याचीही चर्चा आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता सुरू होणार आहे. महाविकास आघाडीकडे तीन पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी असले तरी भाजपकडे मात्र केवळ त्‍यांचेच लोकप्रतिनिधी आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. वंचितच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी ॲड. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात, यावरही दोन्‍ही उमेदवारांची भिस्‍त आहे. कदाचित या दोनपैकी एका उमेदवाराच्या पाठिशी उभे राहू शकतात, अशीही चर्चा आहे. भाजपाने खेळलेले व्यापारी आता कितपत यशस्वी ठरते, याकडे बघणे औत्‍स्‍युक्याचे ठरणार आहे.