POLITICAL SPECIAL बुलडाणा लोकसभेसाठी भाजपकडून नव्या नावाची चर्चा! सुरेश मोगल होऊ शकतात भाजपचे उमेदवार; नव्या चेहऱ्याचे नाव पुढे येताच राजकीय आखाड्यात खळबळ
Feb 29, 2024, 18:11 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात, याची पूर्वकल्पना ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा निवडणुकीत दररोज नवीन राजकीय ट्विस्ट घडत असून सध्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटण्याचे संकेत दिसत आहे, तर दुसरीकडे शिंदे शिवसेना गट व भारतीय जनता पक्षामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता ही जागा भारतीय जनता पक्ष लढविणार की, शिवसेना शिंदे गट लढविणार, याबाबत सध्या राजकीय संभ्रम कायम आहे. भाजपने अडीच वर्षांपासून या मतदारसंघावर दावा सांगणे सुरू केले आहे, त्यादृष्टीने तयारी देखील भाजपने केली आहे. भाजपला ही जागा सुटल्यास भाजपकडून सध्या विधिमंडळात अवर सचिव म्हणून कार्यरत असलेले मातृतीर्थनगरीचे भूमिपुत्र सुरेश मोगल उमेदवार राहू शकतात. तशी चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू आहे.
Add
भाजपने बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणुकीत कमळ फुलविण्याचे प्लॅनिंग सध्या भाजपकडून सुरू आहे. माजी मंत्री आ.डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह एका महाराजांच्या नावाची चर्चा सुरू असताना नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील पीठासीन अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण परिषदेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, देशातील विधानसभेचे सभापती उपस्थित होते. या परिषदेत सुरेश मोगल यांनी आपली छाप पाडली. सध्या विधिमंडळात अवर सचिव म्हणून कार्यरत असलेले मातृतीर्थनगरीचे भूमिपुत्र सुरेश मोगल यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू आहे. भाजपने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवाय पुढील तीस वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील, यासाठी आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक कार्यक्रम वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहे. याशिवाय बुथ व्यवस्थापन, जातीय समीकरण जुळवून आणण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग, उच्च विभूषित असणाऱ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सध्या भाजपने सुरू केला आहे. सध्या विधिमंडळात अवर सचिव असलेले सुरेश मोगल यांना भाजप लोकसभा निवडणुकीसाठी हेरण्याचे संकेत दिसत आहेत.
सुरेश मोगल यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची निवडणूक, राज्यसभा सदस्य निवडणूक, विधान परिषद निवडणुकीत काम केल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय जिल्ह्यात त्यांचा असलेला संपर्क, कोणताही सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करण्याची त्यांची तयारी,प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव, वारकरी संप्रदायासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळून असलेले संबंध, त्यांच्या संपूर्ण नोकरीच्या कालखंडात कोणताही डाग त्यांच्यावर चारित्र्यावर लागलेला नाही असे असताना विदर्भातील दोन मोठे संत, गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा सुरेश मोगल यांच्या नावासाठी आग्रह असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी उमेदवाराची पात्रता ठरवली, त्यात ते शंभर टक्के बसतात. येणाऱ्या काळात हा अनुभव भाजपच्या कामी यावा, यासाठी वरिष्ठ स्तरावरून त्यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. राज्यस्तरीय टीमदेखील जिल्ह्यात येऊन अनेक ठिकाणी चाचणी करून गेल्याची चर्चा आहे. वेळेवर काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सुरेश मोगल लोकसभेचे उमेदवार ठरले तर मातृतीर्थ सिंदखेड राजा ते विधानभवन आणि आता लोकसभा असा हा प्रवास फार मोठा रंजक ठरेल, असे बोलल्या जात आहे.
उच्चशिक्षित आहेत सुरेश मोगल..
सुरेश मोगल हे उच्चशिक्षित असून, त्यांनी एमए अर्थशास्त्र, एलएलबी या पदव्या प्राप्त केल्या आहेत. १९९४ पासून मंत्रालय व विधिमंडळात विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. कृषीमंत्री रणजित देशमुख,महसूलमंत्री दिवंगत पतंगराव कदम, अर्थमंत्री सुनील तटकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मंत्रालयीन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शिवाय अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संपादकीय लेख लिहिण्याची जबाबदारी पार पाडली आहे.