BIG BREAKING अखेर भाजपला दोन जिल्हाध्यक्ष मिळाले! "बुलडाणा लाइव्ह" चे भाकीत खरे ठरले; घाटावर डॉ.गणेश मांटे तर घाटाखाली सचिन देशमुख सांभाळणार जबाबदारी

 
bjp
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर भाजपला मुहूर्त सापडला..कित्येक दिवसांपासून भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष कोण होणार यावर तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते. आता त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्कामोर्तब केले असून बुलडाणा जिल्ह्याला आता पहिल्यांदा दोन जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत. घाटावर आणि घाटाखाली अशी रचना करण्यात आली असून घाटावरील जिल्ह्याचे मुख्यालय तर घाटाखालील जिल्ह्याचे मुख्यालय खामगाव करण्यात आले आहे. घाटावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊळगावराजाचे डॉ.गणेश मांटे सांभाळणार असून खामगावची जबाबदारी याआधी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या जळगाव जामोदच्या सचिन देशमुख यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हाध्यक्ष असलेले खामगावचे आमदार आता माजी जिल्हाध्यक्ष झाले आहेत. जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली दोन जिल्हाध्यक्ष करण्यात येणार असल्याचे राजकीय भाकीत दोन महिन्यांआधीच सर्वप्रथम "बुलडाणा लाइव्ह" ने वर्तवले होते.
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली मातृसंस्था मानणाऱ्या भाजपने संघटन वाढीसाठी आता संघाच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. संघाच्या रचनेत शासकीय  बुलडाणा जिल्ह्याचे आधीपासूनच बुलडाणा आणि खामगाव असे दोन जिल्हे आहेत. शिवाय या दोन्ही जिल्ह्यात काही नव्या तालुक्यांची रचना सुद्धा संघाने कार्यविस्तारासाठी केली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यातून धाड , चिखली तालुक्यातून अमडापूर तर खामगाव जिल्ह्यात खामगावचे विभाजन करून लाखनवाडा तालुका अशी रचना आहे. बुलडाणा जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार पाहता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हाध्यक्षांना पक्षविस्तारासाठी सोयीचे व्हावे म्हणून आता खामगाव व बुलडाणा असे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. लोकप्रतिनधींना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे असा सुर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उमटला होता, त्यानुसार आता राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना संघटनात्मक जबाबदारी पासून मुक्त करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात  घाटावर गणेश मांटे तर घाटाखाली सचिन देशमुख यांच्यावर भाजपने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. नव्या जबाबदारीचा नवे पदाधिकारी कसा न्याय देतात याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले राहील.