भाजपात तालुकापातळीवर खांदेपालट! नव्या जिल्हाध्यक्षांनी नेमले नवे तालुकाध्यक्ष अन् शहराध्यक्ष! चिखलीत शहराध्यक्ष जुनेच कायम ठेवले...

 
Bhp
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होत आहेत. बुलडाणा जिल्हा पातळीवर घाटावर आणि घाटाखाली दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर घाटावरील जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी तालुका व शहर पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत.अर्थात जुन्या पदाधिकाऱ्यांनी ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
घाटावरील जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांच्याकडे मेहकर, सिंदखेडराजा, चिखली आणि बुलडाणा या ४ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. ४ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ७ पैकी ६ तालुक्यांना नवे तालुकाध्यक्ष मिळाले आहेत. यात मोताळा तालुकाध्यक्ष पदी गजानन घोंगडे, बुलडाणा तालुकाध्यक्ष पदी सुनील देशमुख यांच्याऐवजी मोहन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी चिखलीत तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांच्यावेवजी आता सुनील पोफळे तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
  
  चिखली शहर अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देण्याऐवजी पुन्हा एकदा जुने शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यानांच मुदतवाढ देण्यात आली आहे. देऊळगावराजा तालुकाध्यक्ष म्हणून संजय मुंढे, सिंदखेडराजा आत्माराम शेळके तर लोणारला भगवान सानप यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मेहकर तालुक्याची निवड अद्याप व्हायची आहे, बुलडाणा शहराध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा सिद्धार्थ शर्मा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.