खासदार प्रतापराव जाधवांच्या होमग्राउंडवर भाजप अन् शिंदेच्या शिवसेनेत धुसफूस! शिवसेना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लोणार भाजपचा स्वबळाचा नारा!

शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणतात, आम्ही काय.....!
 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेना नेते तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या होम ग्राउंड वर असलेल्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेना आम्हाला विश्वासात घेत नाही, केवळ निवडणुकीपुरते आमचा वापर करून घेते असा आरोप करीत लोणार भाजपने आता स्वबळाचा नारा दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा निर्णय लोणार तालुका भाजपने घेतलाय. काल, २५ मार्चला लोणार तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी जिल्हापातळीवर मात्र दोन्ही पक्षात आलबेल नाही. जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार आणि दोन आमदार अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारचा भाग असताना भाजपशी चांगलेच फटकून वागत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांमध्ये खासदार आणि दोन्ही आमदारांबद्दल असलेला  रोष मनात कायम आहेच. विशेषत: मेहकर आणि लोणार तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी खासदार जाधव आणि आमदार रायमुलकर यांच्याबद्दल नाराज आहेत. स्थानिक निवडणुका मध्ये भाजपला सातत्याने डावलण्यात येत असल्याचे तिथल्या भाजपचे म्हणणे आहे. भाजपला गृहीत धरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांनी आम्ही युतीने निवडणूक लढणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी म्हटले होते, मात्र ही अफवा आहे, शिवसेनेने आमच्याशी त्या संदर्भात कोणतीच चर्चा केली नसल्याचे भाजपने काल झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. लोणारचे भाजप तालुकाध्यक्ष भगवानराव सानप, शहराध्यक्ष गजानन मापारी, विजय मापारी, मातोतराव सुरुशे, संतोष देशमुख, शिवाजी सानप, उद्धव आटोळे, शेख जावेद, तेजराव घायाळ, प्रकाश मुंडे, बाबाराव गीते, संजय दहातोंडे, सुरेश आंभोरे, सखाराम कुळकर्णी, गजानन वाघ, फिरोज खान यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
    
 शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी म्हणतात..!

 भाजपने घेतलेला निर्णय तो त्यांचा विषय आहे. नुकत्याच निवडणुका घोषित झाल्यात. अजून काहीच ठरले नाही, आम्ही काय आमचे पॅनल घोषित केले का? खासदार जाधव आणि भाजपचे वरिष्ठ नेते बसून काय करायचे ते ठरवतील अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना दिली.