मोठा उलटफेर?...तर जालिंधर बुधवंत होऊ शकतात बुलडाणा लोकसभेसाठी उबाठा शिवसेनेचे उमेदवार! बहुचर्चित "संभाव्य" उमेदवाराबद्दल शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांचे नाराजीचे गाऱ्हाणे;

जिल्ह्यातून मुंबईत गेले फोन! शिवसैनिकांच्या अस्वस्थतेचे "हे" आहे कारण..

 
Budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. २८ मार्चला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ४ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून अद्याप अधिकृतरित्या उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. उध्दव ठाकरेंनी जिल्ह्यात ५ सभा घेऊनही उमेदवार घोषित करण्याचे टाळले. उद्या,२६ मार्चच्या मुहूर्तावर उबाठा शिवसेनेची यादी घोषित होणार असल्याचे संजय राऊत यांनी आज धुलीवंदनाच्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले,यामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागे संदर्भात प्रचंड मोठा उलटफेर होण्याची शक्यताही दहापटीने वाढली आहे. बुलडाणा लोकसभेच्या उमेदवारांच्या शर्यतीत एका नवीन पात्राची एन्ट्री झाली असून ते पात्र म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून दस्तरखुद शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आहेत.अर्थात बुधवंत यासाठी स्वतःहून आग्रही नसले तरी जिल्हाभरातील बहुतांश शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्हाला "त्यांच्याऐवजी" बुधवंत असले तरी चालतील पण "ते" नको अशा भावना बोलून दाखवल्या आहेत. तशा आशयाचे अनेक फोन जिल्ह्यातून मातोश्री शी संबंधित असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आज करण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुचर्चित संभाव्य उमेदवाराबद्दल उबाठा शिवसेनेत एकमत नाही. कालपरवा शेगाव मध्ये झालेल्या बैठकीनंतर तर घाटाखालील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आहेत. निष्ठा हाच एकमेव उमेदवारीचा निकष असेल तर आम्हाला दुसरे कुणीही चालेल असे या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. काहींनी तर जालिंधर बुधवंत यांचेही नाव सुचवल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वतः बुधवंत यांच्याजवळ देखील अनेकांनी संभाव्य उमेदवाराबद्दल नाराजी बोलून दाखवत आम्हाला तुमची उमेदवारी मान्य असल्याचे सांगितले. "त्यांनाच" उमेदवारी मिळाली तर आपण राजीनामा देऊ असे एका जिल्हास्थरावरील पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बुलडाणा लाइव्हला सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख या महत्वाच्या पदावर असल्याने बुधवंत यांच्यासमोरही अनेक पेच निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील परिस्थितीची जाणीव बुधवंत यांना मातोश्रीवर करून द्यावी लागणार आहे, त्यामुळे बुधवंत यांची भूमिका महत्वाची आहे. परिस्थिती फारच गंभीर असेल तर निर्णायक क्षणी बुधवंत यांनाच बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवार होण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत बुलडाणा लोकसभेची जागा जिंकणे हा उध्दव ठाकरेंच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उबाठा उमेदवाराचा पराभव म्हणजे उद्धव ठाकरेंचा पराभव असेल त्यामुळे उध्दव ठाकरेंना उमेदवारी घोषित करतांना भावनेचे राजकारण बाजूला ठेवून ग्राउंड रिॲलिटीचा विचार करावा लागणार आहे. अर्थात उद्घव ठाकरे यापैकी काय करतात हे उद्या कळेलच....
आज बैठक...
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईत मातोश्रीवर महत्वाची बैठक आहे. शरद पवार आणि काँग्रेसचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कांग्रेसने देखील बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर आक्रमकपणे दावा सांगायला सुरुवात केली आहे. "निष्क्रिय" उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही असे उघडपणे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघासंदर्भात काय निर्णय होतो याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.