मोठी बातमी! रविकांत तुपकरांना पोलिसांना ताब्यात घेतले; तुपकर म्हणाले, आम्ही काय दहशतवादी आहोत का?
Updated: Dec 19, 2023, 11:29 IST
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): विधानभवनावर हल्लाबोल आंदोलनासाठी जात असलेल्या रविकांत तुपकर यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधानभवन परिसराच्या १ किलोमिटर आधीच रविकांत तुपकर यांना अडवण्यात आले. तिथेच तुपकरांनी ठिय्या मांडला होता. मात्र तणावाचे वातावरण निर्माण होत असताना पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले आहे.
सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी तुपकर यांनी विधानभवनावर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली होती. काल हजारो शेतकरी नागपुरात मुक्कामी पोहचले.आज सकाळपासून शेतकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. पोलिसांनी तुपकारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे सांगितले मात्र तुपकर हल्लाबोल आंदोलनावर ठाम होते. साडेनऊला तुपकर आणि हजारो शेतकरी विधानभवनाकडे जाण्यासाठी निघाले. मात्र विधानभवनाच्या १ किलोमीटर आधीच पोलिसांनी तुपकर आणि शेतकऱ्यांना अडवले, सव्वा अकराच्या सुमारास तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरत्र हलवले आहे. तुपकरांना नेमके कुठे नेण्यात आले याबद्दल अद्याप माहिती नाही.