मोठी बातमी! रविकांत तुपकरांनी आज बोलावली तातडीची बैठक! जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित! राजू शेट्टींकडून तुपकरांचे नेतृत्व दाबण्याचे प्रयत्न? तुपकरांच्या भुमिकडे लक्ष...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज,२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता तुपकर यांच्या स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर या जनसंपर्क कार्यालयात ही बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा याआधीच रविकांत तुपकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीत रविकांत तुपकर काय भूमिका घेतात, बैठकीचा नेमका उद्देश काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे तसेच शेतकरी बांधवांचे देखील लक्ष लागून आहे.
 

२९ जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी  खासदार राजू शेट्टी जिल्ह्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत संग्रामपूर तहसील कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्तांचा मोर्चा निघाला होता. मात्र रविकांत तुपकर या मोर्चात दिसले नव्हते, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. "त्या" दिवशी रविकांत तुपकर कुठे होते? संग्रामपूरच्या मोर्चात ते का आले नाहीत यासह बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे.

 रविकांत तुपकर राजू शेट्टींना नकोत का? 
    
 बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविण्यात रविकांत तुपकरांचा मोठा वाटा आहे. तुपकरांनी वेळोवेळी शेतकरी प्रश्नांवर केलेली आंदोलने संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतांना रविकांत तुपकर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. मात्र काही काळानंतर राजू शेट्टींनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजू शेट्टींच्या शब्दाखातर रविकांत तुपकरांनी लाल दिवा सोडला होता. राजू शेट्टींच्या धोरणांमुळेच रविकांत तुपकर यांना दोनदा ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली. मात्र एवढे होऊनही रविकांत तुपकर यांनी कधीही जाहीरपणे नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र आता गेल्या तीनेक वर्षांपासून तुपकर आणि शेट्टी यांच्यात फारसे जमत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. एरवी आधी प्रत्येक मोठ्या आंदोलनात एकत्र दिसणारे राजू शेट्टी  आणि रविकांत तुपकर जवळपास तीन वर्षांपासून एका मंचावर दिसले नाहीत. रविकांत तुपकरांचे सोयाबीन  कापसाच्या प्रश्नांवर झालेले अन्नत्याग आंदोलन, आक्रोश मोर्चा, त्यानंतरचे जलसमाधी आंदोलन यात राजू शेट्टी कुठेच दिसले नाहीत. बुलडाण्यात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणात देखील राजू शेट्टींना साधा निषेध व्यक्त करायला देखील लवकर वेळ मिळाला नव्हता. एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता रविकांत तुपकर यांचे मोठे होत असलेले नेतृत्व दाबण्याचा प्रयत्नच राजू शेट्टी यांच्याकडून होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २९ जुलैला शेट्टी जिल्ह्यात येऊन गेले मात्र मुद्दामहून रविकांत तुपकर यांना संग्रामपूरच्या मोर्चापासून दुर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राजू शेट्टी यानांच रविकांत तुपकर नको असतील तर मात्र रविकांत तुपकर आज काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल..?