मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या मलकापूर रेल्वे स्टेशनवरील विकासकामांचे भूमिपूजन..! ​​​​​​​

 
modi
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मलकापूर रेल्वे स्थानकावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील ५०६ रेल्वेस्थानकांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन  करतील.नवी दिल्ली येथून ते आभासी पद्धतीने भूमिपूजन करणार आहेत.
 

६ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता हा सोहळा होणार आहे. अमृत भारत  योजनेअंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकासाठी १८.५१ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. देशभरातील ५०६ रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचे एकाच वेळी भूमिपूजन होणार आहे. मलकापूर रेल्वे स्थानकाचे छत नूतनीकरण, ओव्हर ब्रीज, डिजिटल व्हिडिओ स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षालयाचे नूतनीकरण, २ लिफ्ट, आधुनिक प्रसाधन गृह, दक्षिण बाजूने नवीन प्रवेशद्वार अशी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. खा.रक्षा खडसे , माजी आमदार चैनसुख संचेती या कार्यक्रमाला रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी , पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले आहे.