मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांवर अटकेची टांगती तलवार? पोलिसांना न्यायालयाने झाप झाप झापले;१९ ऑक्टोबरलाच निघाले होते अटकेचे आदेश! पण पोलिसांनी दिरंगाई केली;आता पुढे काय होऊ शकत? कायदेतज्ञ म्हणतात...

 
Sg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात आज २४ नोव्हेंबरला चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. २०१२ मध्ये झालेल्या एका हाणामारीच्या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील १७ आरोपींविरुद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९,३०७,५०४, ५०६ आणि आर्म ॲक्ट कलम ४ व २५ व मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय विरोधी दत्ता काकस गटातील ९ आरोपींविरुद्ध देखील गुन्हे दाखल होते. दरम्यान प्रकरण न्यायालयात असताना आमदार गायकवाड गटातील आरोपींनी न्यायालयात हजेरी लावली नाही.त्यामुळे न्यायालयाने आरोपींच्या अटकेचे आदेश दिले. १७ पैकी १४ आरोपींनी आज न्यायालयात अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश श्री.आर एन मेहत्रे यांनी अर्ज फेटाळून लावत आरोपींची जामीन जप्त केली व न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने पुन्हा जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावरील सुनावणी सायंकाळी सव्वासात पर्यंत चालली. साडेसातच्या सुमारास आरोपींचा जामीन अर्ज मंजुर करण्यात आला. मात्र १४ जणांची उद्याच सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या आरोपींची वैद्यकीय तपासणी सुरू असून जिल्हा रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Pj
 २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष दत्ता काकस आणि संजय गायकवाड यांच्या गटात तुफान हाणामारी झाली होती. ९ जानेवारी २०१३ ला ४/१३ क्रमांकाचे हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. २०१९ ला संजय गायकवाड आमदार झाले. दरम्यान प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आमदार संजय गायकवाड व त्यांच्या गटातील १७ जणांनी तारखांना हजर राहणे टाळले. त्यामुळे न्यायाधीश श्री.आर.एन.मेहेत्रे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार संजय गायकवाड यांच्यासह १७ जणांचे अटक वॉरंट जारी केले.
पोलिसांना न्यायालयाने झापले...
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज, न्यायालयाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. अटकेचे वॉरंट १९ ऑक्टोबरलाच निघाले होते, मात्र पोलिसांनी यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. अटक वॉरंट निघून ३५ दिवस होऊनही अटक टाळल्याने न्यायालयाने पोलिसांना चांगलेच झापल्याचे सूत्रांनी सांगितले. १० वर्षे होऊन गेलेल्या केसेसचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत,त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे..
375
आमदार संजय गायकवाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार?
दरम्यान १७ पैकी १४ जणांचा जामीन मंजुर झाला असला तरी आमदार संजय गायकवाड यांच्यावरील अटक वॉरंट कायम आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाडांना अटक करण्याची जबाबदारी आता बुलडाणा पोलिसांची आहे. उद्या आणि परवा शनिवार, रविवार असल्याने आमदार संजय गायकवाडांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. आमदार संजय गायकवाड यांना आता अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर रहावे लागेल, त्यासाठी आता आमदार गायकवाड यांना सोमवारची वाट पहावी लागणार आहे . मात्र तोपर्यंत आ. गायकवाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे, त्यामुळे बुलडाणा पोलीस काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय आ.गायकवाड अटक वॉरंट रद्द करण्यासाठी जेव्हा न्यायालयात हजर होतील तेव्हा न्यायालय काय भूमिका याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे..!