मोठी बातमी! आमदार डॉ. संजय कुटेंच जमलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिलेदारावर आता मोठी जबाबदारी..!

 
sk

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसांत राज्याचे कामगार मंत्री म्हणून डॉ.संजय कुटेंनी लक्षवेधी कामगिरी केली. गेल्यावर्षीच्या जून महिन्यात शिंदेच्या ४० उठावखोर आमदारांची सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात जबरदस्त काळजी घेतली. याचे बक्षीस शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मिळेल असे साऱ्यांनाच वाटत होते,मात्र देवेंद्र फडणवीस आपल्या विश्वासू शिलेदाराला तेव्हा मंत्री बनवू शकले नव्हते. दरम्यान राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू असताना आमदार डॉ.संजय कुटेंबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

 गेल्यावर्षी जून महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.संजय कुटे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती. एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेल्या ४० उठावखोर आमदारांची सुरत, गुवाहाटी आणि परतीच्या प्रवासात गोव्यात नीट व्यवस्था करण्यापासून तर त्यांना थेट बहुमत चाचणीसाठी घेऊन येईपर्यंत डॉ. संजय कुटेंनी सगळ काही चोख बजावलं होत. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने त्यांच्या नावाची त्यावेळी कॅबिनेट मंत्री पदासाठी चर्चा सुरू होती. मात्र "बाहेरच्यांना" दुखावता येणार नाही म्हणून घरच्या डॉ. संजय कुटेंना त्यावेळी डावलण्यात आले होते. चंद्रकांत पाटलांना कॅबिनेट मध्ये घेतल्यानंतर डॉ.संजय कुटेंच्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी सुद्धा होत होती,मात्र तिथे नागपूरच्या चंद्रशेखर बावनकुळेंना संधी मिळाली. तेव्हापासून आ.डॉ.संजय कुटे  त्यांच्या  जळगाव जामोद मतदारसंघात देखील फारसे सक्रिय दिसत नव्हते. नव्या प्रदेश कार्यकारिणीत त्यांच्याकडील प्रदेश उपाध्यक्ष पदही काढून घेण्यात आले,कारण लोकप्रतिनिधींना पुढच्या निवडणुकीची तयारी करता यावी म्हणून संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्याचा नवा नियम भाजपने केला. त्यामुळे प्रदेश स्थरावर काम करणाऱ्या संजय कुटेंसारख्या तगड्या नेत्याला आता होणाऱ्या संभाव्य दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते..!

आता नवी जबाबदारी..!

 दरम्यान संभाव्य दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते की नाही याबाबत अजून अनिश्चितता आहे. आमदार श्वेताताई महाले आणि संजय कुटे या दोघांची नावे बुलडाणा जिल्ह्यातून चर्चेत आहेत. असे असले तरी डॉ.संजय कुटेंवर आता मात्र नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपच्या राज्यातल्या ११ नेत्यांवर एका विशेष मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या मोहिमेचे सारथ्य प्रवीण दरेकरांच्या खांद्याला खांदा लावून डॉ. संजय कुटेंना करावे लागणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल भाजपकडून विशेष जनसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. "मोदी @9 जनसंपर्क अभियान" असे या अभियानाचे नामकरण करण्यात आले असून केंद्रातल्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला त्याचा फायदा व्हावा असा या अभियानाचा अपेक्षित उद्देश आहे. महाराष्ट्रात हे अभियान राबविण्याची जबाबदारी संयोजक म्हणून प्रवीण दरेकर तर सहसंयोजक म्हणून डॉ. संजय कुटेंवर असणार आहे. त्यांच्या मदतीला खा.अनिल बोंडे, खा. धनंजय महाडिक, विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय, आमदार जयकुमार रावल, निरंजन डावखरे, राणा जगजिसिंह पाटील या नेत्यांची फौज असणार आहे.