मोठी बातमी! गजानन धांडे बुलडाणा लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत; अपक्ष रिंगणात उतरणार? फेसबुक पोस्ट मुळे चर्चा...

 
Gajanan
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात कोण कोण उमेदवार रिंगणात राहील अशी चर्चा सुरू असतांनाच आता विकासात्मक पत्रकारितेमुळे वेगळी ओळख निर्माण केलेले आणि अध्यात्मिक,क्रीडा, सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात वावर असलेले सामाजिक चळवळीत काम करणारे गजानन धांडे हे देखील अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत.
 बुलडाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहेत. कुणाची जागा कुणाला सुटेल यासंदर्भात अजून निश्चितता नसतांना अनेक नवे चेहरे अपक्ष म्हणून सध्या रिंगणात उतरले आहेत. त्यात पत्रकार तथा सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून देऊन काम करणारे गजानन जनार्दन धांडे यांचीही उमेदवारी दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. युवा चेहऱ्यांनी राजकारणामध्ये येऊन काहीतरी करण्याची उमेद असल्याने प्रत्येकाने लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करावा आणि लोकांपुढे जावं या उमेदीने नवे तरुण पुढे येत आहेत. विद्यमान परिस्थितीमध्ये लोकसभेचे बुलडाण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खा. जाधवांचे वय हे साठीच्या वर आहे. तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनाच वाव देण्याची गरज असल्याने जय पराजयाची भीती न बाळगता तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यातच गजानन धांडे यांची उमेदवारी लोकाश्रय मिळू शकते. आगामी काळामध्ये बरेचसे चित्र यासंदर्भात स्पष्ट होईल.
फेसबुक पोस्टमुळे चर्चा?
 गजानन धांडे यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्या पोस्टवरूनच गजानन धांडे लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. "येत्या काळात वेगळी आणि ठोस भूमिका घेऊन जगण्याचा विचार करत आहे. आपल्या अवतीभोवती जे घडत आहे, त्याला केवळ पाहत राहणे हे माझ्या सारख्या कळवळा असलेल्या माणसाच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे आपणही काहीतरी केलं पाहिजे या विचारातून भूमिका घेणार आहे. लवकरच ती समोर येईल. तेव्हा आपली सगळ्यांची साथ हवी आहे. आपण पाठीशी रहाल याची खात्री आहे" अशी पोस्ट गजानन धांडे यांनी केली होती.