BIG BREKING चिखलीत राडा! भाजपच्या श्याम वाकदकरांना माजी आमदार राहुल बोंद्रे व समर्थकांकडून मारहाण!
त्यात्यासाहेब बोंद्रेंच्या निधनानंतर केली होती आक्षेपार्ह पोस्ट! राहुल बोंद्रे म्हणाले, खपवून घेणार नाही
Updated: Mar 17, 2023, 11:58 IST

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत आज,१७ मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास तुफान राडा झाला. चिखलीतील श्री शिवाजी विद्यालयासमोर भाजपच्या श्याम वाकदकर यांना माजी आमदार राहुल बोंद्रे व त्यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. राहुल बोंद्रे यांचे वडील त्यात्यासाहेब बोंद्रेंच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी फेसबुकवर केली होती, त्यामुळेच हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे स्वतः राहुल बोंद्रे यांनीच या वृत्ताला दुजोरा दिलाय. वडिलांबद्दल आक्षेपार्ह बोललेल कोण खपवून घेणार, आज थोडक्यात झाले ,यानंतर परिणाम वाईट होतील असा सज्जड दम राहुल बोंद्रे यांनी दिलाय.
या प्रकारानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय. वाकदकर यांना चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ,तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. वाकदकर यांच्या कानाचा पडदा फाटल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आ. श्वेताताई महाले अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्याने त्यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त होऊ शकली नाही.