BIG BREKING रविकांत तुपकर हाच आमचा पक्ष! स्वाभिमानीच्या बैठकीतील एकमुखी सुर; राजु शेट्टींवर रोष! रविकांत तुपकर म्हणाले, केसाने गळा कापण्याचा प्रयत्न!

माझ्याऐवजी दुसरं कुणी असत तर आत्महत्या केली असती!  स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची; माझी हकालपट्टी कुणीही करू शकत नाही म्हणाले..

 
rt

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर रविकांत तुपकर यांच्याबाबत जी चर्चा होती तेच झालं.रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. राजू शेट्टी यांच्याकडून त्यांचे नेतृत्व दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू होती. त्याला स्वतः रविकांत तुपकर यांनी दुजोरा दिला. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्याएवजी दुसरं कुणी असतं तर आत्महत्या केली असती असे तुपकर आज म्हणाले. मला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे आहे. आता महाराष्ट्रभर  तरुणांची फौज उभी करणार आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे रविकांत तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर यांनी राजु शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आज बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल रोष व्यक्त केला. रविकांत तुपकर हेच आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सुर होता. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासारखेच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दोन गटात विभागली जाईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

people 

तुमच्या माझ्या आयुष्याचा या चळवळीसाठी जो प्रवास झाला त्याच्या निर्णायक टप्प्यावर आपण आहोत, हे केवळ रविकांत तुपकरांनी केलं नाही तर तुमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या असे रविकांत तुपकर म्हणाले. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंत झालेल्या चळवळीच्या प्रवासातील आठवणींना यावेळी त्यांना उजाळा दिला. या प्रवासात अनेक सोबती आले, एखादा टक्का गेले असतील मात्र जेव्हापासून छातीला संघटनेचा बिल्ला लावला तेव्हापासून लाखो कार्यकर्ते सोबत आहेत, वर्षाला कार्यकर्ते बदलण्याचा धंदा मी केला नाही. कार्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपल, माझ्यावर संकट आली तेव्हा शेतकऱ्यांच्या पोरांनी छातीचा कोट करून माझी साथ दिली असे रविकांत तुपकर म्हणाले. गावागावात माणसं जोडली, त्या माणसांशी आजही माझा संपर्क आहे, मी स्वयंसेवकासारखं काम केलं असं रविकांत तुपकर म्हणाले. 
    
 सदाभाऊ आणि मी महाराष्ट्र पिंजून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवली. त्यासाठी दोन दोन - तीन महिने घरापासून दूर राहिलो, संघटनेसाठी स्वतःला गाडून घेतल. घरादाराची ,लेकरांची पर्वा केली नाही, लग्नावेळी बायकोला सांगितल की तू माझ्यासाठी नंबर दोन आधी माझी चळवळ असे तुपकर म्हणाले.
 
 एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल, त्याचे नेतृत्व फुलत असेल तर नेत्याच्या पोटात दुखायला नको. नेत्याच्या पोटात दुखत असेल तर त्याच्यापेक्षा मोठ पाप नाही, नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत. आपल्या आयुष्यात संकट आल्यावर नेतृत्व आपल्याला वाऱ्यावर सोडत असेल तर यापेक्षा मोठे दुःख नाही असे रविकांत तुपकर म्हणाले. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. माझ्याऐवजी दुसर कुणी असत तर आत्महत्या केली असती मात्र माझ आयुष्य नी समाजासाठी अर्पण केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे असे रविकांत तुपकर म्हणाले. ज्याला जीव लावला तोच बेइमानीची भाषा करत असेल तर यापेक्षा मोठ दुःख नसत, आज मी त्याच परिस्थितीतून जात असल्याचे ते म्हणाले..
  
  तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझी  शिकार करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर तुमचा खांदा त्यांना द्यायचा की नाही हा निर्णय तुम्ही घ्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही  त्यासाठी खांदा इमानदार आणि खानदानी असावा लागतो असे रविकांत तुपकर म्हणाले.

आज रविकांत तुपकर अनेकांना नको वाटतो..!

आयुष्याचे  २० वर्ष आम्ही चळवळीसाठी दिले मात्र आज काहींना रविकांत तुपकर नको वाटतो. नको वाटतं असेल तर सांगा पण केसान गळा कापण्याचा प्रयत्न करू नका. आमचा विद्रोहाचा, बंडाचा पिंड आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी  भांडत राहू असे रविकांत तुपकर म्हणाले. मी कधीही कार्यकर्त्यांचे नुकसान होईल असे वागलो नाही, आम्ही चळवळीमध्ये विश्वास कमावला, मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही मात्र स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर समोर असणाऱ्या चपला ही आमची श्रीमंती आहे असे रविकांत तुपकर म्हणाले.

दरबारात हुजरेगिरी करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. नेतृत्वाची भूमिका पालकत्वाची असायला हवी. नेतृत्वाने कार्यकर्त्याच्या पाठीवर हाथ ठेवत कार्यकर्त्याला बळ द्यायला पाहिजे. नेतृत्व फुटक्या कानाचे नसावे, आम्ही बुलडाण्यात ५० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला ही आमची चूक आहे का? सरकार बरोबर आम्ही स्वतंत्र चर्चा केली ही आमची चूक आहे का? याउलट नेतृत्वाला आनंद व्हायला पाहिजे असे रविकांत तुपकर म्हणाले.
   
 संघटनेत एक गट असा आहे जो तुम्हाला मला संघटनेतून हाकलायचा प्रयत्न करीत आहे. मात्र संघटना ही काही त्यांची खाजगी मालमत्ता नाही. आम्ही २० वर्षांपासून चळवळ वाढवली आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे असे रविकांत तुपकर म्हणाले.

जुना किस्सा..

   २०१४ ला मला चिखली विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करायला सांगितली मात्र पक्षनेतृत्वाने नंतर थांबायला सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून महामंडळ देण्याचा शब्द दिला. सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. महामंडळाचे अध्यक्ष केले. त्यावेळी पहिला फोन राजू शेट्टींना केला तेव्हा त्यांनी केवळ ओके ओके एवढं म्हणत अभिनंदन केल असेही रविकात तुपकर म्हणाले. राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यात वाद झाले त्यावेळी सदाभाऊंना बाजूला करू नका असे मी त्यांना सांगितले मात्र त्यावेळी त्यांनी ऐकल नाही.त्यांच्या शब्दाखातर मी राजीनामा दिला. २०१९ ला राजू शेट्टींनी लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितली, मात्र युतीमुळे तेव्हाव्ही माघार घेतली. विधानपरिषद मिळेल असे सांगण्यात आले मात्र राजू शेट्टींचा पराभव झाला आणि विधानपरिषदेसाठी त्यांचे स्वतःचेच नाव पुढे करण्यात आले. आताही रविकांत तुपकर हेच लोकसभेचे उमेदवार असे राजू शेट्टी सांगतात तसे असेल  माझ्या जिल्ह्यात येता तर मला तर सांगा असे तुपकर राजू शेट्टींना उद्देशून म्हणाले. 

  हा प्रवास सुरू ठेवायचा की थांबवायचा..

 आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचल्यानंतर रविकांत तुपकर यांनी " हा प्रवास सुरू करायचा की थांबावयाचा?" असा सवाल केला. त्यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी प्रवास सुरू ठेवायचा असे सांगितले. राजू शेट्टी आमच्यासाठी पक्षश्रेष्ठ नाहीत, तुम्ही आमच्यासाठी पक्षश्रेष्ठी आहात असे बैठकीतील कार्यकर्त्यांनी तूपकरांना सांगितले. 
आमच्यासोबत राहून आमचा घात करणाऱ्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर "ईट का जबाब पत्थर से देंगे" असे तुपकर म्हणाले. आमची ताकद केवळ बुलडाण्यात नाही, ज्या जिल्ह्यात पाऊल ठेवू त्या जिल्ह्यात ताकद निर्माण करू असेही तुपकर म्हणाले. "राज्यभर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या माग उभ राहण्याचा निर्णय आज घेत आहे, राज्यभर मोठी आणि नव्या दमाची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पायाला भिंगरी लावून फिरेल, २० वर्षात जेव्हढा फिरलो नाही तेव्हढा एका वर्षात फिरेल. तुम्ही मला चिमटा घ्यायचा प्रयत्न केला आता त्याचे फळ चिमटा घेणाऱ्यांना मिळेल असे रविकांत तुपकर म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपलीच आहे, कुणीही आपली हकालपट्टी करू शकत नाही. या जिल्ह्यात येऊन संघटनेत कुणी ढवळाढवळ करू नये, यायचे असेल तर आम्हाला विश्वासात घेऊन या असे रविकांत तुपकर शेवटी म्हणाले.