BIG BREAKING बुलडाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना घेतले ताब्यात!कार्यकर्ते आक्रमक, तुपकरांचे शांततेचे आवाहन ​​​​​​​

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथील पिकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतले. प्रथम रविकांत तुपकर यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले असून त्यांच्यावर आता नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे वृत्त कळताच कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे शांततेचे आवाहन तुपकरांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
 

१५ जून पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक देऊन एआयसी विमा कंपनीच्या २० मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारु असा गंभीर इशारा दिलेला आहे. त्यांनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलिसांनी तुपकरांना १० जून रोजीच नोटीस बजावली होती. आंदोलन करु नये, असे सूचित केले होते तर आता माघार नाही, जीव गेला तरी चालेले पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी जाहीर केली होती. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पिकविमा कंपनीने ७० कोटी रुपयांची मदत जाहीर करुन १३ जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवातही केली. १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यात ५६ लाख ७५ कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित रक्कम जमा होणार आहे. दरम्यान शहर पोलिसांनी आज १४ जून रोजी दुपारी आरसीबी पथका आणि तगड्या बंदोबस्तासह अचानक तुपकरांच्या घरी धडक देत तुपकांना ताब्यात घेतले आणि शहर पोलीस ठाण्यात आणले. तुपकरांना नेमके कशासाठी ताब्यात घेण्यात आले, त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार आहे याबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त कळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर कार्यकर्त्यांनी सध्या कोणतीच भूमिका घेऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये, असे शांततेचे आवाहन रविकांत तुपकरांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.