BIG BREAKING माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या विरोधात आमदार श्वेताताईंच्या स्विय सहायकांची पोलीस ठाण्यात तक्रार! राहुल बोंद्रेंनी खोटे व बदनामीकारक वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोप

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे व त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर यांना आज सकाळी मारहाण केली होती. दरम्यान आता हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. या घटनेनंतर राहुल बोंद्रे यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना श्याम वाकदकर यांनी आपल्या वडिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप केला होता, शिवाय वाकदकर हे आमदार श्वेताताई महाले यांचे पिए असल्याचेही ते म्हणाले होते, दरम्यान आता हाच धागा पकडून आमदार श्वेताताई महाले यांचे स्विय सहाय्यक चंद्रकांत काटकर यांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राहुल बोंद्रे यांनी श्याम वाकदकर हे श्वेताताई महाले यांचे स्विय सहाय्यक असल्याचे खोटे व बदनामीकारक वक्तव्य करून आमदार व स्विय सहाय्यकांची बदनामी करून सार्वजनिक शांतता व्यवस्थेला धोका निर्माण केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेशी आमचा काडीमात्र संबंध नसतांना राहुल बोंद्रे यांनी उगाचच आमच्यावर  खोटे व बिनबुडाचे आरोप केलेत. राहुल बोंद्रे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून याआधीही त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे  गुन्हे दाखल असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजकीय सुडाची भावना ठेवून राहुल बोंद्रे  हे सार्वजनिकपणे आमदार व त्यांच्या स्विय सहाय्यकांविरुद्ध  खोटे आरोप सातत्याने करीत असतात असेही काटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. श्याम वाकदकर यांना झालेली मारहाण ही किरकोळ घटना आहे, भविष्यात त्यांचे समर्थन करणाऱ्यांना सुद्धा याचा सामना करावा लागेल अशी धमकीच राहुल बोंद्रे यांनी दिली असल्याचेही चंद्रकांत काटकर यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.