BIG BREAKING महायुतीत धुसफूस! भाजप नेते विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले..

 
ब्जप
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यपातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित दिसत असली तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र अंतर्गत धुसफूस कायम आहे. काल हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा बॉम्बगोळा टाकल्याने महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण गरम असताना आता महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला न सुटल्याने नाराज असलेले विजयराज शिंदे उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. भाजपचे मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.अर्ज भरण्याआधी माध्यमांशी बोलतांना शिंदे म्हणाले की, भाजपच्या वतीने, मतदारांच्या वतीने अर्ज भरत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटावा, या मतदारसंघात कमळ चिन्हाचा उमेदवार असावा ही कार्यकर्त्यांची सुप्त भावना आहे. या भावनेला वाट मोकळी करून देत असल्याचे ते म्हणाले.
कालपासूनच विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा रंगली होती. बुलडाणा लाइव्ह ने कालच त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले. काल विजयराज शिंदे यांना विचारणा केली असता पाहू असे उत्तर त्यांनी दिले होते, दरम्यान आता त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
शिंदेंसह कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल...
दरम्यान विजयराज शिंदे दोन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एक अर्ज अपक्ष तर दुसरा अर्ज भाजपच्या नावाने दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरतेवेळी विजयराज शिंदे यांच्यासह कार्यकर्ते गळ्यात भाजपचा रुमाल घालून आले होते, त्यामुळे शिंदेंच्या बंडाला भाजपचा आतून पाठींबा आहे का? अशी चर्चा रंगली आहे.. 
   यामुळे होते नाराज...
खा.प्रतापराव जाधव यांच्यामुळेच २०१९ ला विजयराज शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे तेव्हा वंचित वर लढून शिंदेंनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तत्कालीन मुळ शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर स्थानिक राजकारण पाहून शिंदेंनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा शिवसेना सोबत नसल्याने भाजपकडून देखील विजयराज शिंदेंना प्रमोट करण्यात आले होते. त्यादृष्टीने शिंदे यांनी जिल्हाभर संपर्क वाढवला होता. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या लोकसभा प्रवास योजनेच्या प्रवासात देखील शिंदे सोबत होते. मात्र विद्यमान खा.प्रतापराव जाधव शिंदे गटात सहभागी झाले आणि शिंदेंच्या तयारीला ब्रेक लागला. भाजपने विजयराज शिंदेंना लोकसभा निवडणुक प्रमुख केले, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे बुलडाणा लोकसभेची जागा भाजपला सुटावी असा आग्रह शिंदे धरत होते, शेवटपर्यंत जोर लावून त्याला यश आले नाही. शिंदेंच्या शिवसेनेने खा. जाधवांचीच उमेदवारी जाहीर केली, तेव्हापासून शिंदे नाराज आहेत. अलीकडे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातील बॅनर वर देखील शिंदेचा फोटो नव्हता त्यामुळे शिंदे समर्थक देखील नाराज होते. आता या नाराजीचा फटका महायुतीला किती बसतो हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल..