BIG BREAKING मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विजयराज शिंदेंना फोन; अर्ज मागे घेण्याची विनंती; पण, शिंदे म्हणाले...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली होत आहेत. आज विजयराज शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी नागपुरात आहेत. दरम्यान नागपूर दरबारी असताना विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला, मुख्यमंत्री शिंदे यांनी विजयराज शिंदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र शिंदे अद्यापही लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. "तुमचा मंत्री आमची औकात काढतो, तुमचा आमदार मला लढण्याचे खुले चॅलेंज देतो, आधी त्यांना आवरा" असे विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गिरीश महाजन यांना निरोप पाठवला होता. गिरीश महाजन हे देखील आज बुलडाण्याला येणार होते, मी तुम्हाला भेटायला येतोय असा फोन गिरीश महाजन यांनी विजयाराज शिंदे यांना केला. मात्र त्यावर "मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या भेटीसाठी नागपूरला आलोय" असे विजयराज शिंदे यांनी गिरीश महाजन यांना सांगितले. दरम्यान सध्या विजयराज शिंदे नागपुरात पोचले असून काही वेळातच त्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होणार आहे, त्यानंतर विजयराज शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.