BIG BREAKING बुलडाणा लाइव्हचे भाकीत खरे ठरले..! रणजित पाटलांना दणका बसलाच ! बुलडाण्याचे धिरज लिंगाडे झाले अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार; वंचितच्या अंमलकारांचा परिणाम नाही

 
Lingade
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर रणजित पाटलांना मोठा फटका बसेल असे भाकीत "बुलडाणा लाइव्ह" ने वर्तवले होते. अखेर आज, ३  फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमरावती पदवीधर मतदार संघाच्या लांबलचक मतमोजणी नंतर ते खरे ठरल्याचे दिसून आले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत बुलडाण्याचे भूमिपुत्र धिरज लिंगाडे यांनी १२ वर्षे पदवीधर मतदारांच्या भरोश्यावर आमदारकी उपभोगणाऱ्या रणजित पाटलांना धूळ चारली. त्यामुळे विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आता आमदार धिरज रामभाऊ लिंगाडे करणार असल्याचे स्पष्ट झाले.

 Lingade

काल,२ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीत रणजित पाटलांना आघाडी घेण्याची संधीच लिंगाडे यांनी दिली नाही.  मतमोजणीच्या चारही फेऱ्यात धिरज लिंगाडे आघाडीवर राहिले. दरम्यान एकूण मतांच्या १ लाख २ हजार ४०३ मतांच्या मोजणीनंतर ८७३५  मते बाद झाल्याने विजयी मतांचा कोटा ४६९२७ एवढा ठरवण्यात आला होता. त्यावेळी लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३३४० तर रणजित पाटलांना ४१०२७ मते मिळाली होती. 

  रडीचा डाव अंगलट..!

दरम्यान त्याचवेळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी बाद झालेल्या ८७३५ मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने ती मान्य केल्यानंतर मध्यरात्रीनंतर बाद ठेवलेल्या मतांची पुन्हा मोजणी झाली. मात्र ही मागणी रणजित पाटलांच्या पुन्हा अंगलट आली. ८७३५ पैकी ३४८ मते वैध ठरवण्यात आली. यातही लिंगाडे यांच्या पारड्यात १७७ तर रणजित पाटील यांना १४५ एवढी मते मिळाली. ३४८ मते वैध ठरवण्यात आल्याने आधीची वैध मते ९३८५२ व नंतर वैध ठरवण्यात आलेली ३४८ अशी एकूण वैध मतांची संख्या ९४ हजार २०० एवढी झाली. त्यामुळे आधी ठरवण्यात आलेला ४६ हजार ९२७ मतांचा कोटा रद्द करून  ४७ हजार १०१ एवढ्या ठरवण्यात आला. ही प्रक्रिया पहाटे पर्यंत चालली.दरम्यान पहिल्या पसंतीत कुणीच ४७१०१ मतांचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. 
   
दुसऱ्या पसंतीतही लिंगाडेची आघाडी...

दरम्यान अत्यंत क्लिष्ट असलेल्या या मतमोजणीच्या वेळी दुसऱ्या पसंतीतही धिरज लिंगाडे यांनीच आघाडी घेतली. सर्वात कमी मते मिळवलेल्या शेवटच्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची मते  ज्या ज्या उमेदवाराला मिळाली त्या त्या उमेदवारांना त्या मतांचे वाटप करण्यात येते. अशा पद्धतीने कमी मते मिळवणारा एक एक उमेदवार बाद करण्याची पद्धत या मतमोजणीदरम्यान करण्यात येत असते. मात्र बऱ्याच उमेदवारांच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीची मतेच दिली नसल्याने ही प्रक्रिया आज,३ फेब्रुवारीच्या  दुपारी २ वाजेपर्यंत चालली. अखेर २२ उमेदवार बाद झाल्यानंतर धिरज लिंगाडे यांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या ४७१०१ मतांचा कोटा आधी पूर्ण केल्याने त्यांचा विजय झाला. वंचितच्या अनिल अंमलकार यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची १४६७ मते धिरज लिंगाडे यांना मिळाली.तर रणजित पाटील यांना अमलकार यांच्या पत्रिकेवरील ६४५ मते मिळाली. त्यामुळे रणजित पाटील यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजल्यानंतर लिंगाडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला. लिंगाडे यांनी ३३८४ मतांची आघाडी घेतली.

 ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू असे म्हणणाऱ्या रणजित पाटलांना मात्र पदवीधर मतदारांनी चांगलाच दणका दिला. काही माध्यमांनी तर वंचितचे अनिल अंमलकार आणि रणजित पाटील यांच्यात लढत होईल अशा शक्यता वर्तविल्या होत्या,मात्र अनिल अंमलकार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. धिरज लिंगाडे यांनी मिळवलेल्या एकूण मतांच्या १० टक्के मतेही अंमलकार यांना मिळवता आली नाहीत.