BIG BREAKING ठरल! यादवांवर खा.जाधव भारी पडले! बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्रतापराव गणपतराव जाधव महायुतीचे उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर
Mar 28, 2024, 19:19 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज उद्या म्हणता म्हणता अखेर २८ मार्च , गुरुवारच्या मुहूर्तावर बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाली. १५ वर्षे खासदारकी भोगल्यानंतर पुन्हा एकदा प्रतापराव गणपतराव जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा.जाधव यांच्या नावाची घोषणा करून बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार राहील या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून भाजपने खूप जोर लावला होता. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत ५ -६ वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. खा.जाधव यांना पुन्हा उमेदवारी नको, हा मतदारसंघ भाजपला मिळावा असा भाजप कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांचा एकमुखी सुर होता. भाजपने केलेल्या निवडणुकपूर्व सर्वेक्षणात देखील खा. जाधवांची जागा धोक्यात दाखवली होती.स्वतः आमदार संजय गायकवाड यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र भाजप नेतृत्वाने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे म्हणणे व निवडणूकपूर्व सर्व्हे सर्व काही कोलून लावत युती धर्माच्या नावाखाली हा मतदारसंघ पुन्हा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ताब्यात दिला आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातून ३ वेळा आमदार ,नंतर बुलडाणा लोकसभेचे ३ वेळा खासदार झालेल्या प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. आता या निवडणुकीत त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर, संदीप शेळके यांच्यासह महाविकास आघाडीने अद्याप जाहीर केलेल्या नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान असणार आहे.