अधिकार नसताना राहुल बोंद्रेंच्या हस्ते भूमिपूजन! माजी नगराध्यक्षा सौ. देव्हडे म्‍हणाल्या, ही तर चिखली शहरवासीयांची शुद्ध फसवणूक!!

 
file photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन राजशिष्टाचाराप्रमाणे स्थानिक आमदारांच्या हस्ते होणे अपेक्षित आहे. परंतु नियमांना तिलांजली देत माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नगरपालिकेचा कार्यक्रम नसताना तो नगरपालिकेचा कार्यक्रम आहे असे भासवून भूमिपूजन करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला आहे, ही संपूर्ण चिखली शहरवासीयांची फसवणूक आहे, अशी टीका माजी नगराध्यक्षा सौ. विमलताई देव्हडे यांनी केली आहे. टीका करताना त्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे पत्रदेखील सोबत जोडले आहे. पत्रात भूमिपूजन होऊ घातलेल्या कामांचे अद्याप कार्यारंभ आदेश दिले नाहीत, असे नमूद केले आहे. एवढेच नाही तर १७ कोटींच्या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नगरपालिका प्रशासनामार्फत ठेवण्यात आलेला नाही हे देखील स्पष्ट केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ही बाब स्पष्ट केल्यामुळे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा खोटेपणा जनतेसमोर उघडा पडला आहे.

कोणत्याही माजी आमदारांनी असा प्रकार केला नाही...
सौ. देव्हडे म्हणाल्या, की आजवर कोणत्याही माजी आमदाराने शासकीय निधीतील कामांचा भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रकार केला नाही. कार्यारंभ आदेश दिले नसताना अशी नियमबाह्य कृती ही केवळ माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे करू शकतात, असेदेखील त्या म्हणाल्या.

आमदार सौ. श्वेताताई महालेंनी अट्टाहास केला नाही...
यापूर्वी भाजपाचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी नव्हे तो कोट्यवधींचा विकास निधी चिखली शहरासाठी दिला. मात्र हा निधी आल्यानंतर आमदार श्वेताताई महाले यांनी कधीही भूमिपूजन करण्याचा अट्टाहास केला नाही. मात्र चिखली शहराला स्वतःची मालमत्ता समजण्याचा प्रकार दोन कुटुंब करत आहेत. चिखली शहर ही दोन कुटुंबाची मालमत्ता नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही सौ. देव्हडे म्‍हणाल्या.

राजशिष्टाचाराचे पालन करून भूमीपूजन व लोकार्पण...
वास्तविक पाहता नियमाप्रमाणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते व आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत होणे आवश्यक आहे. या कामाचा पाठपुरावा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केला व त्यांनी दलित वस्ती मधून निधीही उपलब्ध करून दिला. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मात्र ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला ते भूमिपूजनाचा अट्टाहास करत नाही व ज्यांचा काही संबंध नाही, जे कुठल्याही शासकीय पदावर नाहीत ते मात्र चिखलीकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतात ही बाब गंभीर आहे, असेही सौ. देव्हडे म्हणाल्या.

माजी आमदार व नगराध्यक्षांनी घेतलेले भूमिपूजन हे बेकायदेशीर, नियमबाह्य असल्याने हा श्रेय लाटण्याचा प्रकार असून, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचासुद्धा प्रकार आहे. त्यांनी घेतलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनधिकृत आहे. त्यामुळेच राजशिष्टाचाराप्रमाणे नियमानुसार पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते  व आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच शासकीय पातळीवर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन घेण्यात येणार असल्याचे देखील प्रसिद्धीपत्रकात सौ. देव्हडे यांनी म्हटले आहे.