'आयपीएल सामन्यावर सट्टा' : अमडापूर, जानेफळ, देऊळगाव राजा, हद्दीतील ५ सट्टेबाज पकडले! एलसीबीची कारवाई...
Apr 16, 2024, 10:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) देशातील सर्वात मोठा क्रिकेटोतस्व म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सव मानला जातो, मात्र एकीकडे सट्टेबाज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावून लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. कायद्याने सट्टा लावणे गुन्हा आहे, अवैध आहे. तरीसुद्धा काही ठिकाणच्या अड्ड्यांवर सट्टेबाजांची टोळी असते. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर, जानेफळ व देऊळगाव राजाहद्दीत सुद्धा विविध ठिकाणी क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ५ सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण १ लाख ४४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Advt.👆
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काल सोमवारी ही धडक कारवाई केली. अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अमडापूर टाउन येथून शेख फहीम शेख सलीम (४०वर्ष) या सट्टेबाज आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून नगदी ८०५० , १५००० रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण २३,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, जानेफळ हद्दीत येणाऱ्या हिवरा खुर्द गावातून शेख इमरान शेख अख्तर (२९ वर्ष) रा. मेहकर तालुका, आसिफ खान शफीर खान (३३वर्ष), रोहित रामदास शिंदे (२४ वर्ष) दोघे रा. जानेफळ यांना पकडण्यात आले आहे. तिघांकडून २७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील सय्यद सय्यद हबीब याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. वरील पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई...
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी अपोअ. बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे-प्रभारी अधिकारी स्था. गु. शा. यांचे नेतृत्वात, सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि, सचिन कानडे, रवि मोरे, सफौ. गजानन माळी, पोहेकॉ. दिनेश बकाले, पो.कॉ. जयंत बोचे, दिपक वायाळ स्था.गु.शा-बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली आहे.