POLITICAL SPECIAL तयारी तर सुरू केली केली; पण आ. डॉ. शिंगणेंमुळे अडचण! माजी आ. शशिकांत खेडेकरांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय?

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे जांगडगुत्ता; कसे असेल समीकरण? वाचा...

 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): करायला गेलो एक अन् झालं दुसरंच अशी अवस्था सध्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.शशिकांत खेडेकर यांची झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आता त्यांची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. अर्थात ते स्वाभाविक आहे, कारण निवडणूक तर लढवायची, आमदार तर व्हायचेच पण मेळ कसा जमेल याचा चाचपणी शशिकांत खेडेकर यांच्याकडून सुरू आहे. स्वतः शशिकांत खेडेकर, चिरंजीव श्रीनिवास खेडेकर यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र "सध्या" महायुतीचे घटक असलेले आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामुळे शशिकांत खेडेकर यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे, तसे झाले तर त्यात पहिला नंबर डॉ.राजेंद्र शिंगणेंचा असावा अशी मनोमन इच्छा डॉ. खेडेकरांना वाटत असावी. कारण तसे झाले तरच शशिकांत खेडेकरांना महायुतीची उमेदवारी मिळू शकते,अन्यथा डॉ.राजेंद्र शिंगणे महायुतीत राहिले आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्रित लढल्या तर महायुतीकडून उमेदवारीवर पहिला दावा हा विद्यमान आमदार या नात्याने आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांचाच असणार आहे. महायुतीकडून केवळ एकटे खेडेकरच इच्छुक आहेत का तर नाही.. तोताराम कायंदे, डॉ.सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉ.गणेश मांटे,आता नव्याने तयारीला लागलेले योगेश जाधव यांच्या आमदार होण्याच्या इच्छा काही लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भाऊ गर्दीमुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत चांगलाच जांगडगुत्ता निर्माण झाला आहे.

  महायुतीत आतापर्यंत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. २०१४ मध्ये भाजप शिवसेना वेगवेगळे लढूनही शिवसेनेकडून डॉ.शशिकांत खेडेकर ६४,२०३ मते घेऊन आमदार झाले. भाजपचे डॉ.गणेश मांटे ४५३४९ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. स्वतः डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडून माजी आ.रेखाताई रिंगणात होत्या. त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.त्यांना ३७ हजार १६१ तर त्यावेळी मनसेत असणाऱ्या विनोद वाघ यांनी चौथ्या क्रमांकाची १३,५३३ एवढी मते घेतली होती. काँग्रेसचे प्रदीप नागरे ५ व्या क्रमांकावर होते. पक्षीय बळाचा विचार केला तर सिंदखेडराजा विधानसभेत शिवसेना भाजपची ताकद असल्याचे दिसून आले. २०१४ च्या आकडेवारीच्या बळावर खरेतर २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र असल्याने शशिकांत खेडेकर डोळे लावून पुन्हा आमदार व्हायला पाहिजे होते. पण ५ वर्षे सक्रिय राजकारणापासून दुर राहिलेले डॉ.राजेंद्र शिंगणे परतले आणि राष्ट्रवादीचे तिकिटावर पुन्हा आमदार झाले. याचा अर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात डॉ.राजेंद्र शिंगणे हाच लोकांचा पक्ष असल्याचे दिसुन आले. राष्ट्रवादी काँग्रेसची तेवढी ताकद असती २०१४ ला रेखाताई आमदार झाल्या असत्या.
   महाविकास आघाडी अन् शितयुद्ध...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळात डॉ.राजेंद्र शिंगणे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.त्यामुळे विरोधात निवडणुक लढविणाऱ्या डॉ. शशिकांत खेडेकरांचा श्वास गुदमरू लागला.भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून , श्रेयवादावरून या दोन नेत्यांमध्ये तेव्हा चांगलीच गुंतल्याचे अख्ख्या मतदारसंघाने पाहिले. राज्यपातळीवर महाविकास आघाडी पण मतदारसंघात काही एकमेकांचे जमेना अशी अवस्था होती. महाविकास आघाडी कायम राहिली तर आपले राजकीय भविष्य काय? ही भीती यावेळी डॉ.शशिकांत खेडेकरांना सतावत होती. 
खेडेकरांना वाटल आता जमलं...
योगायोगाने अडीच वर्षांनंतर डॉ. खेडकरांना हा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली कारण शिवसेनेत दोन गट झाले. डॉ.शशिकांत खेडेकर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले. आता शशिकांत खेडेकर सत्तेत आणि आमदार डॉ.शिंगणे विरोधात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी असलेल्या जवळकीचा फायदा घेत शशिकांत खेडेकर यांनी माजी आमदार असताना देखील निधी आणण्याचा प्रयत्न केला. पुढच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. पण, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खेडेकरांचा हा आनंद काही फार काळ टिकू दिला नाही. अजित पवार महायुतीत आले आणि त्यापाठोपाठ जिल्हा बँकेच्या हिताचे कारण सांगून आ.डॉ.राजेंद्र शिंगणे पुन्हा महायुतीत परतले...
आता पुढे काय?
आजघडीला डॉ.राजेंद्र शिंगणे आणि डॉ.शशिकांत खेडेकर हे दोन्ही नेते महायुतीचा भाग आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती अबाधित राहिली तर दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यातही विद्यमान आमदार या नात्याने डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा दावा मजबूत आहे. त्यांना डावलून शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी हे स्वप्नवत आहे. त्यामुळे खेडेकरांना उमेदवारी मिळवायची असेल तर एकतर डॉ.शिंगणे पुन्हा शरद पवार गटात जाण्याची वाट पहावी लागेल नाहीतर स्वतः खेडेकरांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल. आता लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकरांना या मतदारसंघातून जवळपास ३० हजार मतांचा लीड मिळाला आहे. बुलढाणा लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची घोषणा त्यांनी केली. स्वतः रविकांत तुपकर देखील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघात चांगलेच गुंतागुंतीचे राजकारण सुरू आहे. या गुंतागुंतीच्या राजकारणात माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकरांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे येणारा काळच सांगेल....