आ. श्वेताताईंचा "पॅटर्न" च वेगळा! "आमदार आपल्या दारी मुळे" शासकीय योजनांचा थेट मिळतोय लाभ! दलालांच्या कमिशन खोरीला बसलाय चाप...

 
Xcc

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील कायदे मंडळाचे एक सभागृह असलेल्या विधानसभेचे आमदार हे त्या, त्या मतदारसंघातील लक्षावधी लोक व शासन यांच्यातील दुवा असतात. याशिवाय आपल्या मतदारांच्या आशा, आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याचे व शासकीय योजनांचे लाभ थेट मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उन्नत करण्याचे कार्यदेखील या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असते. या कसोटीवर आ. श्वेताताई महाले या पूर्णपणे खऱ्या उतरत असून आपल्या चिखली मतदारसंघात त्यांनी जनसेवेचा आगळावेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. 'आमदार आपल्या दारी' हा पॅटर्न इतर आमदारांसाठी अनुकरणीय असून आ. महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयोग जनसामान्यांचे जीवन बदलवून टाकणारा ठरत आहे.

जनसेवेचा वसा घेऊन २०१४ मध्ये राजकारणात आलेल्या श्वेताताई महाले यांनी सुरुवातीपासूनच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत जनतेशी नाळ जोडली. याचेच फलित म्हणून जिल्हा परिषदे महिला व बालकल्याण सभापती आणि २०१९ मध्ये त्या आमदार झाल्या. जनतेप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी अधिक जोमाने प्रयत्न चालू ठेवले. एकीकडे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणत मूलभूत नागरी सुविधा पुरवत तसेच विविध प्रलंबितमार्गे कामे लावत त्यांनी एक विकासाचे नवे पर्व सुरू केले, तर दुसरीकडे शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्यदेखील आ. महाले यांनी हाती घेतले. 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमाद्वारे सेवालाल या आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामदूतांमार्फत मतदारसंघातील लक्षावधी लोकांना शासकीय योजनांचे लाभ थेट मिळवून देण्याचा त्यांचा हा अभिनव पॅटर्न सर्वसामान्य लोकांसाठी कमालीचा फायदेशीर ठरत आहे. 
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये बोकाळलेल्या दलालांनादेखील यामुळे चाप बसला असून शासकीय यंत्रणा झाडून कामाला लागल्याचे चित्र पाहावयास मिळते. योजनांचे फायदे चिखली शहरासह मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मिळत असून या निमित्ताने आ. श्वेताताई महाले यांचा नित्य जनसंपर्क व अखंड लोकसेवा सुरू आहे.
अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा
'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीद प्रमाण मानून लोकप्रतिनिधित्वाचे कार्य करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे मी माझे कर्तव्य समजते, अशी प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली. जनतेने दिलेले आमदारपद जनतेच्या हितासाठी उपयोगात आणणे हीच यामागे भावना असल्याचे त्या म्हणाल्या. या उपक्रमातून जास्तीत जास्त लोकांनी शासकीय योजनांच्या लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.अशी होते अंमलबजावणी
आ. श्वेताताई महाले यांच्या अभिनव पॅटर्नमधून शासकीय योजनांच्या लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाते. कार्यालयीन कर्मचारी व ग्रामदूत असे मिळून जवळपास ५० जण या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. ग्रामदुतांमार्फत मतदारसंघात गावोगावी व घरोघरी शासकीय योजनांची माहिती पुरवली जाते, पात्र कागदपत्रे भरून घेतली जातात व ती फाईल संबंधित विभागाच्या कार्यालयात सादर करून त्यांचे लाभ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात. बरेचदा विविध प्रमाणपत्रे किंवा लाभाचे एखाद्या कार्यक्रमांमधून वितरण केले जाते. आ. श्वेताताई महाले यांचे या संपूर्ण अंमलबजावणीवर बारीक लक्ष असते.