आ. संजय कुटेंनी वाचला राज्य सरकारच्या विकासात्मक योजनांचा पाढा! म्हणाले, बजेट महिला , शेतकरी आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून; महायुतीचे सरकार सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विकास करणारे...

 
संघटनात्मक
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्यातील माता - भगिनींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात आणली. नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, व युवकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वव्यापी, सर्वस्पर्शी असून सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन भाजपचे नेते तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. आज ५ जुलै रोजी, स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विजयाताई राठी, सिद्धार्थ शर्मा, राजेश्वर उबरहंडे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. कुटे म्हणाले, संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत भगिनींना मोठी अडचण निर्माण झाली होती. नव्हे तर, लहान मोठ्या कागदपत्रांसाठी त्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. परंतु हे लक्षात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या अटींमध्ये योग्य ते बदल घडविले. काही अटी शिथील केल्या. यामुळे राज्यभरातील भगिनींना सोयीचे झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकाराला वर्षाला ४६ हजार कोटी रुपये लागणार असल्याचे ते म्हणाले. ज्या काही अटी अडचणी ठरत असल्यास यावर देखील मुख्यमंत्री शिंदे निश्चितपणे बदल घडवून आणतील. पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलांपर्यंत ही योजना पोहोचवल्या जाणार आहे. या योजनेशिवाय, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात तरुण, शेतकरी, महिला यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प लोककल्याणकारी ठरणार असल्याचे आ. कुटे म्हणाले. महिलांना एसटी महामंडळ मध्ये ५० टक्के सवलत दिली आता एसटी महामंडळ तोट्याकडून नफ्याकडे प्रवेश करीत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचा विमा वितरित झाला असून आता आणखी ३ हजार कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे ते म्हणाले.
१० लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधीत दहा हजार रुपये प्रति महिना अनुदान देण्याचा निर्णयदेखील राज्य शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. महिलांचे बचत गट सुरू झाल्यानंतर आधी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळायचे आता त्यात आणखी १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून खेळते भांडवल म्हणून आता ३० हजार रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी तालुका केंद्रावर विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करत शाश्वत शेती करता यावी यासाठी सुद्धा राज्य शासन प्रयत्नशील आहे असेही डॉ.संजय कुटे म्हणाले.
संघटनात्मक प्रश्नांवर म्हणाले...
बुलडाणा शहराला शहराध्यक्ष नाही, मेहकर तालुक्यातही संघटनात्मक पातळीवर वाद आहेत याबाबत छेडले असता ते म्हणाले की भाजप हा कार्यकर्ता आधारित पक्ष आहे. नेते असो वा नसो कार्यकर्ता म्हणजे भाजप आहे असे आ. डॉ.कुटे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे मान्य करीत एक खोटा नेरीटिव्ह आमचे विरोधात सेट करण्याचा प्रयत्न झाला, भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलल्या जाईल असा प्रचार झाला, याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो असे ते म्हणाले. मात्र एखादा नेरीटिव्ह एकाच निवडणुकीत चालतो, त्यामुळे आता पुढचा काळ आमचाच आहे असेही डॉ.कुटे म्हणाले.