मोताळ्यात बीडीओ मोहोड यांच्या दालनाला ठोकले टाळे!; सभापतींनीच केले आंदोलनाचे नेतृत्त्व
Jan 29, 2022, 10:25 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आठ दिवसांपासून गटविकास अधिकारी मोहोड सुटीवर आहेत. त्यांनी कुणाकडे चार्जही दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांची कामे थांबली असून, ते पंचायत समितीत चकरा मारून त्रस्त झाले आहेत. ओरड सुरू झाल्यानंतर काल पाचव्या दिवशी, २८ जानेवारीला गटविकास अधिकाऱ्यांनी चार्ज दिला. पण कोणतेही अधिकार दिले नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेते ॲड. गणेशसिंह राजपूत, पंचायत समिती सभापती प्रकाश बस्सी यांच्या नेतृत्त्वात आक्रमक सदस्यांनी थेट दालनालाच कुलूप ठोकले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्याने दुपारी तीनच्या सुमारास पंचायत समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
मोहोड हे रूजू झाल्यापासून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. तालुक्यातील विविध विकास योजनांची कामे वाऱ्यावर असून, अनेक कामे रखडली आहेत. दुसरीकडे गटविकास अधिकारी न सांगताच सुटीवर जात असतात. गेल्या आठ दिवसांपासूनही ते गायब आहेत. त्यांनी त्यांचा चार्ज इतरांकडे देण्याची आवश्यकता आहे. मात्र तसे न करताच ते सुटीवर गेले.
शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे अनुदान, घरकुल योजनेचे हप्ते, रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्हा मुख्यालयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला काल कुलूप ठोकल्याचे ॲड. राजपूत यांनी सांगितले. आंदोलनात माजी सभापती अवी पाटील, कैलास गवई, उखा चव्हाण, माजी उपसभापती कुंवरसिंग परमार यांच्यासह शेतकऱ्यांनी भाग घेतला.