ऑगस्ट कोरडा गेला, सप्टेंबरवरही "अल निनो" चा प्रभाव! आता फक्त हलकाच पाऊस; गेल्या ८ वर्षातील सर्वात कमी पावसाची भीती! कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची होतेय मागणी!.

कधी परतणार पाऊस? पाऊस का रुसलाय? वाचा सविस्तर....
 
map

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदाच्या खरीप हंगामात जून कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. तो मुसळधार नसला तरी पेरणीयोग्य होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र त्यानंतर घाटाखाली जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात झालेली जीवघेणी अतिवृष्टी वगळता कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. घाटावर तर अक्षरशः घशाला कोरड पडली आहे, धरणांतील पाणी आटत चालले आहे. पिके करपत चालली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल अशी आशा लावून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यावर "अल निनो" चे सावट आहे. सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस पाठ फिरवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून दिसलाच नसतांना त्याच्या परतीच्या प्रवासाची तारीख देखील जाहीर झाली आहे. यंदा १७ सप्टेंबर पासून राजस्थान मधून मान्सून चा परतीचा प्रवास सुरू होईल, महाराष्ट्रातून ५ ते ८ ऑक्टेबर दरम्यान मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे.

८ वर्षातील सर्वात कमी पाऊस..

यंदा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पावसाची तूट आहे. सध्या  मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय असल्याचे पश्चिमी वाऱ्यांची गती मंदावली आहे. त्यामुळेच पावसाचा वेग कमी झाल्याचे हमामान तज्ञांचे म्हणणे आहे. या कारणामुळेच पुढील काही दिवस महाराष्ट्रात कुठेही मुसळधार पाऊस होणार नाही,फक्त हलक्याच सरी बरसतील. येत्या २ -४ दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असली तरी हवामान विभागाने राज्यात कुठेही एलो किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाही. यंदा २०१५ नंतरच्या सर्वात कमी पावसाची नोंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भ मराठवाडा कोरडाच..

 २ सप्टेंबर पासून मान्सूनचे टोक हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे सरकेल. त्यानंतर ईशान्य भारतात पुन्हा जोरदार पाऊस होईल. महाराष्ट्रात मात्र पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी सप्टेंबर चा पहिला आठवडा उलटणार आहे. मात्र तेव्हाही हा पाऊस कोकण , मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी होईल मात्र विदर्भ आणि मराठवाड्याला यंदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील अशी चिन्हे आहेत. गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक कोरडा ऑगस्ट - सप्टेंबर यंदाचा असेल असेही काही हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यंदा कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.