होते पालकमंत्री म्‍हणून शेतकरी आंदोलनाचा शेवट झाला सुखद!

बातमीमागची बातमी
 
file photo

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संवेदनशीलता वादातीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा अन्‍नत्‍याग सत्‍याग्रह संपुष्टात आणताना त्‍यांची ही बाब पुन्हा अधोरेखीत झाली. पदाचा बडेजावपणा नाही आणि पाय कायम जमिनीवर राहत असल्याने आधी रुग्‍णालयात तुपकरांना भेटायचे ठरलेले डॉ. शिंगणे परिस्‍थिती पाहून थेट आंदोलनस्थळीच आले आणि पुढे जे घडले ते अगदी टोकाच्या आक्रमकपणावर जादूची कांडी फिरावी त्‍यागत घडले. पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा, परिस्‍थितीवर नियंत्रणासाठी तैनात केलेले दंगा काबू पथक, रस्त्यावर अडवलेले कार्यकर्ते, निवासस्थानासमोर आणलेली रुग्‍णवाहिका, आम्‍ही तुमचे उपोषण सोडणार नाही, केवळ तुमच्या तपासण्या करायच्या आहेत असे म्‍हणत रुग्‍णालयात नेण्यासाठी सुरू झालेली तयारी आणि त्‍याला तुपकरांचा सुरू असलेला विरोध... तुपकरांना रुग्‍णालयात न्यायचेच या उद्देशाने सुरू असलेली तयारी... अन्‌ तितक्यात पालकमंत्र्यांचे झालेले आगमन... त्‍यानंतर एकूणच वातावरण निवळले, तुपकरांनीही पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देण्याचा निर्णय घेतला... पालकमंत्र्यांनी केवळ तोंडी आश्वासने दिली नाहीत, तर तशा वरिष्ठ स्‍तरावर हालचालीही केल्या, थेट उपमुख्यमंत्र्यांना बोलले... आणि या आंदोलनाचा कोणाला टोकाचा त्रास न होता सुखद समारोप झाला...!

असे बदलले वातावरण...
अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे बळीराम गीते, गृहविभागाचे गुलाबराव वाघ, गिरीश ताथोड या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दंगाकाबू पथक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. रुग्णवाहिकासुद्धा तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात आली होती. तुपकरांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनाही रस्त्यावरच अडवण्यात येत होते. आम्ही तुमचे उपोषण सोडणार नाही. केवळ तुमच्या तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात न्यायचेय. रुग्णालयात तुम्हाला भेटण्यासाठी पालकमंत्री येणार आहेत, असे पोलीस अधिकारी तुपकरांना सांगत होते. मात्र लिखित पत्र मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी घेतली होती. जबरदस्ती सहन करणार नाही, अशी भूमिका त्‍यांनी घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. शेतकरी, कार्यकर्तेही संतप्त होते. आता जे होईल ते होईल पण तुपकरांना न्यायचेच या इराद्याने पोलिसांनी रुग्णवाहिकेतून स्ट्रेचर काढले व तुपकरांना उचलण्यासाठी पोलीस अधिकारी सरसावले. आता पुढे काय... काय होईल... अशी चिंता सर्वांना वाटत असतानाच पालकमंत्री डॉ. शिंगणे रुग्णालयात न जाता थेट तुपकरांच्या निवासस्थानी आल्याचे दिसले....

आंदोलनाचे फलित...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी १७ नोव्हेंबरपासून अन्‍नत्‍याग आंदोलन सुरू केले होते. चौथ्या दिवशी सकाळी ते मागे घेतले. २४ नोव्हेंबरला तुपकर यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक लावण्यात आली आहे. त्या बैठकीचे रीतसर निमंत्रण पालकमंत्र्यांनी तुपकरांना दिले. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मागण्यांसंदर्भातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातल्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा करू, असा शब्द तुपकरांना दिला. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सोयापेंड आयात करण्यात येणार नाही, असा विश्वास दिला. डॉ. शिंगणे यांनी तुपकरांना अन्‍नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आणि तुपकरांनी पालकमंत्र्यांच्या शब्दाला मान देत आंदोलन मागे घेतल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. विशेषतः पोलीस प्रशासनावरील मोठा ताण हलका करण्यासाठी पालकमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

...म्‍हणून जिल्हाधिकारी येऊ शकत नव्हते!
बळाचा वापर करून तुपकरांना जिल्हा रुग्णालयात न्यायचेच यादृष्टीने पोलीस प्रशासनाने तयारी केल्याचे एकूण परिस्‍थितीवरून दिसून येत होते. तसे झाले असते तर कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता होती. केंद्र सरकारकडे मागण्या असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राशी बोलावे. त्यासाठी आमच्या मागण्या समजून घ्याव्यात, असा तुपकरांचा आग्रह होता. तहसीलदार,जिल्हा कृषी अधिकारी तुपकरांना भेटायला कालच आले, मात्र तुपकरांनी त्यांना माघारी पाठवले होते. विधानपरिषद निवडणुका लागल्याने आचारसंहिता असल्याने कलेक्टर येऊ शकत नाही, असा निरोप प्रशासनाने तुपकरांना दिला होता. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांशी बोलायला प्रोटोकॉलची अडचण येते, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे तुपकर व शेतकरी अधिक संतप्त झाले होते. प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याने स्वाभिमानी कार्यकर्ते शेख करीम यांनी मंडपासमोरच अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने आंदोलन चिघळले. आंदोलकांनी रस्ता अडवला. पोलिसांची व्हॅन आणि रुग्‍णवाहिकेवरही दगडफेक झाली. अंगात त्राण नसताना तुपकरांनी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान केल्याने वातावरण निवळले होते. मात्र मध्यरात्री पुन्हा तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला. वाघाजाळ फाट्यावर ट्रक पेटवून दिल्याने आंदोलनाने वेगळे वळण घेतले. दुसरीकडे या हिंसक घटना आमच्या आंदोलनकर्त्यांनी घडवून आणल्या नाहीत, अशी भूमिका तुपकरांनी घेतली होती. मात्र सायंकाळच्या घटनांना जबाबदार धरत शहर पोलीस ठाण्यात रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांच्यासह २०-२५ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता होती. आता पालकमंत्र्यांनी हे गुन्‍हे मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

पोलीस प्रशासनावर वाढला होता ताण...
पोलीस असले तरी शेवटी माणूसच. आंदोलनामुळे त्‍यांच्‍यावरील ताण वाढला होता. आंदोलन शेतकऱ्यांचे असल्याने त्‍यांनाही एकदम कठोर वागता येत नव्हते. शक्‍य होईल तसे आंदोलन हाताळणे सुरू होते. आंदोलन पेटले तर त्‍याचाही ताण पोलीस यंत्रणेवरच येणार होता. आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत होती. तरीही जाळपोळ आणि रस्ता रोखण्याचे प्रकार झाल्याने कायदा-सुव्यवस्‍था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनाही भावना बाजूला ठेवून कर्तव्‍य पार पाडावे लागले असते. पण पालकमंत्र्यांनी त्‍यांच्‍याही मनावरील मोठे दडपण दूर केले, असेच म्‍हणावे लागेल.