खासदार प्रतापराव जाधवांचा आणखी एक दिमाखदार विजय! मेहकरच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागा जिंकल्या; महाविकास आघाडीला भोपळा; "बाप तो बाप रहेगा" गाण्यावर खा.जाधवांनी थोपटले दंड
May 10, 2023, 16:14 IST
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मेहकर आणि लोणारच्या बाजार समित्यांवर भगवा फडकवल्यानंतर खा. प्रतापराव जाधवांनी आणखी एक दिमाखदार विजय मिळवलाय. दि. मेहकर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खा.प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वातील भूमिपुत्र पॅनलने दणदणीत विजय मिळवित सर्वच्या सर्व १७ जागा जिंकल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बऱ्यापैकी कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पॅनलला मात्र एकही जागा जिंकता आली नाही.
काल,९ मे रोजी ही निवडणूक पार पडली. एकूण १५ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात होते. २ जागा आधीच अविरोध निवडणूक आल्या होत्या. अविरोध निवडून आलेल्या उमेदवारांत शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश वाळुकर यांचा समावेश आहे. खा. प्रतापराव जाधव यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे या निवडणुकीतील १७ पैकी १७ जागा भूमिपुत्र पॅनलने जिंकल्या. गेल्या ३० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे खरेदी विक्री संघावरही खा. जाधवांचेच वर्चस्व आहे हे विशेष. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. खा. प्रतापराव जाधव यांना कार्यकर्त्यांनी उचलून खांद्यावर घेतले. यावेळी "बाप तो बाप रहेगा" गाण्यावर खा.प्रतापराव जाधवांनी दंड थोपटल्याचे दिसून आले.