रविकांत तुपकरांच्या आणखी एका साथीदाराला अटक! दामु अण्णा इंगोले यांना वाशिम जिल्ह्यातून उचलून बुलडाण्यात आणले! उद्या न्यायालयासमोर हजर करणार...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या २५ साथीदारांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अकोला येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुपकर यांच्या कालच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणारे वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

वाशिम जिल्ह्यातून त्यांना  दुपारी अटक करण्यात आली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सध्या त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात लॉक - अप सुविधा नसल्याने इंगोले यांना रात्री चिखली पोलीस ठाण्यात नेण्यात येईल, त्यानंतर उद्या १३ फेब्रुवारीला त्यांना बुलडाणा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.