अन् आ. श्वेताताई महालेंनी "ती" पोस्ट वाचून दाखवली! म्हणाल्या, यात आक्षेपार्ह काय?
चिखलीचे राजकारण व्यक्ती द्वेषाचे होत असल्याचे बोंद्रे म्हणतात पण सोशल मीडियाचा वापर करून राहुल बोंद्रे यांनीच एका महिलेला हाताशी धरून माझी व माझ्या कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न केला होता असेही यावेळी आ. श्वेताताई म्हणाल्या. कैलासवासी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या बद्दल आमच्या मनात आदरच आहे. गेलेल्या व्यक्तीबद्दल चुकीचे बोलत नसतात, मीच काय माझ्या पक्षातील कुणीच तात्यासाहेब किंवा गेलेल्या आदरणीय व्यक्तीबद्दल चुकीचं बोलणाऱ्याचे समर्थन करत नाही. मात्र ज्या पोस्टचे कारण पुढे करून श्याम वाकदकरांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली त्यात आक्षेपार्ह होते तरी काय? असा सवाल आ. श्वेताताईंनी करीत पोस्ट वाचून दाखवली.
काय आहे ती पोस्ट?
"स्वयंघोषित पदव्या विकणे आहे
समाजसेवकांना - समाजसेवक
उद्योजकांना - उद्योजक
तपश्चर्या करणाऱ्यांना- ऋषीमुनी
सेवा उद्योग करणाऱ्यांना - तुल्य" अशी पोस्ट श्याम वाकदकर यांनी त्यांच्या फेसबुकवर केली होती.
खरे विकृत कोण?
राहुल बोंद्रे यांनी श्याम वाकदकरांना विकृत म्हटले. श्याम वाकदकरांच्या मुलाचा दहावीचा पेपर असताना त्याच्या डोळ्यासमोर राहुल बोंद्रे यांनी वाकदकरांना मारहाण केली, त्यामुळे आता खरे विकृत कोण याचा तपास होणेही गरजेचे असेही आ. श्वेताताई म्हणाल्या.
श्याम वाकदकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार..!
श्याम वाकदकर माझे पीए असल्याचे राहुल बोंद्रे धडधडीत खोटे बोलले. ते माझे पिए नाही मात्र ते माझे भाऊ आहेत. चिखली विधानसभेतील लाखो तरुण माझे भाऊ आहेत. माझ्या भावावर येणाऱ्या कोणत्याही संकटात मी त्यांच्यासोबत आहे. श्याम वाकदकर यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. श्याम वाकदकरांना समर्थन देणाऱ्यांना सुद्धा परिणामांना सामोरे जावे लागेल असे बोंद्रे म्हणाले होते, आम्ही वाकदकर कुटुंबाच्या सोबत आहोत, काय परिणाम होतात ते पाहून घेऊ असे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या. चिखलीचे विकासाचे वातावरण राहुल बोंद्रे यांच्याकडून दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असल्याचे त्या म्हणाल्या.
होय चिखली बदलत आहे..!
चिखली बदलत असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले, होय खरच चिखली बदलत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात शेकडो किमी लांबीचे रस्ते होत आहेत, याआधी झाली नाहीत तेवढी शेत रस्त्यांची कामे होत आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामामुळे मतदारसंघातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे ओझे आता उतरत आहे. मतदारसंघातील १२८ रस्त्यांना आम्ही योजनेत समाविष्ट केले आहे. चिखलीचा प्रवास आता विकासाच्या दिशेने होत आहे असेही आ. श्वेताताई म्हणाल्या.