आंदोलन अपडेट ः गावागावात आंदोलनाचा माहोल!

शेतकरी एकवटले, धरणे देऊन आवळली वज्रमूठ!
 
file photo

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन, कापूस उत्‍पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहाची धग आज, १८ नोव्‍हेंबरला जिल्ह्याच्या गावागावात पोहोचली. नागपुरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना सरकारने पोलीस बळाचा वापर करून तुपकरांना अटक करून बुलडाण्यात आणले. या कारवाईचा संताप शेतकऱ्यांच्‍या डोळ्यांत दिसत असून, मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता त्‍यांनीही वज्रमूठ आवळल्याचे दिसून आले. दिवसभरात बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगावसह अन्य तालुक्‍यांतील बहुतांश गावात शेतकऱ्यांनी प्रभातफेरी काढली. नंतर ठिय्या देत धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्‍यांनी केला. दडपशाहीमुळे अजिबात न डगमगता तुपकरांनी आपल्या चिखली मार्गावरील निवासस्थानासमोरच अन्‍नत्याग आंदोलन सुरूच ठेवल्याने सरकारला जबरदस्त चेकमेट बसला आहे. उलट या कारवाईमुळे संताप वाढल्याने त्याचा भडका उद्या, १९ नोव्‍हेंबरला होणाऱ्या राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनात उडण्याची चिन्हे आहेत.

tupkar1

परवा, २० नोव्हेंबर रोजी गावबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिली. बुलडाणा तालुक्यातील वरवंड, नांद्राकोळी, तांदूळवाडी, पांग्री उबरहंडे, चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत, भरोसा, कवठळ, गुंज, अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, शेलगाव जहागिर, पेठ, सोमठाणा, दिवठाणा, कवठळ, सिंदखेड राजा तालुक्यातील सिंधी, सवडद, साखरखेर्डा, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा, मेहकर तालुक्यातील आरेगाव, अंत्री देशमुख, गोहेगाव, हिवरा खुर्द, सारशिव, आरेगाव, मादनी या गावांसह जिल्ह्यातील बहुतांश छोट्या मोठ्या गावांत आंदोलन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. काही गावांत आज रात्री मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. आंदोलन केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुरते मर्यादित न राहता त्यात शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने व्यापकता वाढली आहे.

tupkar2

सोयाबीनला किमान ८ हजार, कपाशीला १२ हजार स्थिर भाव, सोया पेंडची आयात तात्काळ रोखावी, साठा मर्यादा रद्द करावी, महावितरणची मनमानी थांबवावी आदी मागण्यांसाठी तुपकर यांनी विविध टप्प्यातील हे आंदोलन जाहीर केले आहे. त्यांनी कार्यकर्ते, शेतकरी यांच्यासमवेत नागपुरातील संविधान चौकात काल अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला. पोलिसांनी नाकारलेली परवानगी अन्‌ संचारबंदी याची तमा न बाळगता तुपकरांनी सुरू केलेल्या या सत्याग्रहाने आधी नागपूर पोलीस, स्थानिक प्रशासन अन नंतर शासन अडचणीत आले. कार्यकर्त्यांची फौज अन्‌ कडक बंदोबस्तामुळे संविधान चौकाला छावणीचे स्वरूप आले. सत्याग्रह स्थळी स्फूर्ती गान, घोषणा असा माहौल असताना तेथील बंदोबस्त क्रमाक्रमाने वाढवत पोलिसांनी बुधवारी रात्री परिसर सील केला. दस्तुरखुद्द डीआयजी रेड्डींसह पोलिसांचा ताफा तुपकारांशी चर्चेसाठी आला. आंदोलन मागे घेण्यास तुपकरांनी वारंवार नकार दिला. मात्र संविधानिक पद्धतीने सुरू असलेले हे आंदोलन दडपण्यात अखेर पोलीस यशस्वी ठरले. पोलिसांनी अटक करून तुपकरांची आरोग्य तपासणी करून थेट बुलडाण्यात आणले. मात्र सत्याग्रह दडपला तरी तुपकरांनी बळजबरीचा प्रवासच काय आपल्या निवासस्थानी आल्यावरही अन्‍नत्याग सुरूच ठेवला. घरासमोर नागपूर आणि बुलडाणा पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रांगणात लावण्यात आलेला शामियाना, परिसरात जमा होणारे संतप्त कार्यकर्ते अन्‌ शेतकरी अशा थाटात बुलडाण्यातही अन्नत्याग सुरूच आहे.

tupkar4

अन्‍न घेणार नाय म्हणजे नाय -तुपकर
दरम्यान, नागपुरातील सत्याग्रह दडपला असला तरी मागण्यांची पूर्तता होईस्तोवर अन्नाचा एक कणही घेणार नाही. यात जीवाचे बरेवाईट झाले तरी चालेल, असा निर्धारच तुपकरांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखविला. स्वाभिमानी कार्यकर्ते अन्‌ शेतकऱ्यांनी शांतता आणि संयम ठेवावा, असे आवाहनदेखील त्यांनी या चर्चेदरम्यान  केले. तसेच उद्या १९ नोव्‍हेंबरला विदर्भ, मराठवाडा व खानदेशात आयोजित रास्ता रोको वा चक्का जाम आंदोलन व २० तारखेचे गाव बंद आंदोलन प्रतिकात्मक पद्धतीनेच करावे. त्यामुळे कायदा सुव्यस्था बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना केले.

tupkar5

खा. शरद पवारांनी घेतली दखल
दरम्यान, १७ नोव्‍हेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी तुपकरांच्या सत्याग्रहाची दखल घेतल्याचे वृत्त आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेत यावर विचारणा झाली असता आपली तुपकरांशी चर्चा झाली असून मी त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे ते म्हणाले. त्यांचे आंदोलन सामंजस्याने सुरू असून, त्यावर त्याच पद्धतीने तोडगा काढावा लागणार आहे. आपण (दिल्ली दरबारी) तसे प्रयत्न करू, असेही त्यांनी पत्रकारांच्या सलग प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

tupkar6

"अन्नत्याग'मध्येही रास्ता रोको!
दरम्यान सततच्या प्रवासामुळे असलेला ताप, ७० पर्यंत खाली गेलेली शुगर याउप्परही तुपकर यांनी अन्‍नत्याग सुरूच ठेवला. यामुळे प्रकृती खालावत असतानाही आज गुरुवारी दिवसभर तुपकर यांनी उद्याच्या रास्ता रोकोचे नियोजन करत अन्‌ विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. राज्यभरातील संतप्त व आक्रमक कार्यकर्त्यांना २० नोव्हेंबरनंतरचे आंदोलनही संयमानेच करण्याची विनवणीवजा सूचना ते करीत राहिले.

tupkar7