अन् ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहचले आ. गायकवाडांचे चिरंजीव कुणाल! काही महिन्यांआधी झाली होती झोंबा - झोंबी पण आता....

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात कुणीच कधी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो..त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या पक्षात राहूनही व्यक्तिगत पातळीवर मात्र विरोधी विचारांच्या नेत्यांशी मैत्री आणि स्नेहभाव ठेवणाऱ्या अनेक नेत्यांची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. हल्लीच्या  राजकारणात जिल्ह्यात अशी उदाहरणे विरळ दिसत असली तरी अगदीच नाही असेही नाही. तर हे सांगायचे  कारण असे आहे की आज,२८ फेब्रुवारीला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आ.गायकवाडांचे चिरंजीव कुणाल यांनी लावलेल्या हजेरीची चर्चा तर होणारच भाऊ...

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना गल्लीपासून मुंबई - दिल्लीपर्यंत दोन गटात विभागली. बुलडाण्यातही तेच झाले. दोन आमदार, एक खासदार, १ माजी आमदार शिंदेच्या बाजूने गेले तर ज्यांना अजून आमदार - खासदार होता आले नाही ते बडे चेहरे ठाकरेंच्या बाजूने राहिले. त्यामुळे आतापर्यंत इतर विरोधी पक्षांवर आक्रमकपणे तुटून पडणारी जिल्ह्यातील  शिवसेना एकमेकांवरच तुटून पडली. अनेकदा प्रकरण हमरी तुमरी वरून ठोका - ठोकी पर्यंत गेल्याचे दिसले. बुलडाण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे

नरेंद्र खेडेकर, बुधवंत यांच्यासह प्रमुख नेत्यांना आ. गायकवाडांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. आ. गायकवाडांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते. विशेष म्हणजे घडल्या प्रकारचे आ. गायकवाडांनी समर्थन केले होते. त्यानंतर आमदार गायकवाडांनी  चून चून के मारण्याची  भाषा केली तर अंबादास दांनवेंनी जिल्ह्यात येऊन आधी गिनुन घ्या, त्यातला एक निवडा असे चॅलेंज आ. गायकवाडांना दिले होते. या सगळ्या प्रकारामुळे जिल्ह्यातल्या दोन्ही शिवसेनेत आतापर्यंत चांगलेच वातावरण पेटलेले आहे, अशा पेटत्या वातावरणात  स्वतः  आ.गायकवाडांच्या पुत्रांनी बुधवतांना शुभेच्छा द्यायला जाण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल.  पेटलेली आग विझवण्यासाठी कुणाल गायवाडांकडून उचलेले पाऊल पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल...बर जाऊद्या..जे होतय ते चांगल हे..! राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा, व्यक्तिगत संबंधाच्या आड राजकारण येऊ देऊ नका हेच यानिमित्ताने शिकूया...!!