रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांची फौज आज नागपुरात धडकणार! उद्या सकाळी,विधानभवनावर हल्लाबोल करणार! तुपकरांचा उद्या गनिमी कावा? नेमकं काय करणार..?

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. गेल्या दीड महिन्यात एल्गार रथयात्रा, बुलडाण्यातील एल्गार महामोर्चा, त्यानंतरचे अन्नत्याग आंदोलन, मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन झाले. रविकांत तुपकरांची आधी राज्य सरकारसोबत चर्चा झाली, त्यानंतर दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुपकरांची बैठक झाली.बहुतांश मागण्या मान्य करण्याचा शब्द सरकारने दिला होता, त्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विषय वगळात इतर मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही. रविकांत तुपकर यांनी सरकारला १५ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. मात्र निर्धारित वेळ न पाळल्याने रविकांत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत विधानभवनावरील हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली आहे. आज, १८ डिसेंबरला तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज नागपूरकडे कूच करणार असून उद्या, १९ डिसेंबरच्या सकाळी विधानभवनावर हल्लाबोल करणार आहे.
आज १८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या फर्दापूर टोलनाक्यावर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समृध्दी महामार्गाने तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज आज रात्री नागपुरात दाखल होईल. नागपुरातील गोणकरी चौकात असलेल्या कुमार लॉन्स मध्ये आज रात्रीचा मुक्काम होणार असून उद्या,१९ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे..
  नेमकं काय करणार...
"आमच्या मागण्या १५ डिसेंबरच्या आत मान्य कराव्यात, सरकारने दिलेला शब्द पाळावा. अन्यथा पुढील आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने करू"असे भाष्य तुपकर यांनी २९ नोव्हेंबरला सह्याद्रीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. तुपकर यांनी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली असली तर या आंदोलानाचे नेमके स्वरूप काय असेल याबद्दल बोलणे टाळले आहे. तुपकर यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांची आगळीवेगळी स्टाईल पाहता उद्या नागपुरात तुपकर नेमकं काय करणार याकडे पोलीस यंत्रणांसह साऱ्यांचे लक्ष लागून आहे..